(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha News : हिंगणघाटच्या हैदराबाद महामार्गवरील उड्डाणपुलावर पडले मोठे भगदाड; राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
हिंगणघाट शहरातील हैद्राराबाद महामार्गावरील उड्डाणपुलावर मोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. अवघ्या दोन वर्षाआधी बांधण्यात आलेल्या या पूलाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
Wardha News हिंगणघाट : हिंगणघाट शहरातील हैद्राराबाद महामार्गावरील उड्डाणपुलावर मोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. अवघ्या दोन वर्षाआधी बांधण्यात आलेल्या या पूलाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. शिवाय अवघ्या दोन वर्षांत पूलाची दुरावस्था होत असेल तर नक्कीच यात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असावे, परिणामी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले (Atul Wandile) यांनी केली आहे. तसेच या खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही अतुल वांदिले यांनी दिला आहे.
दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या उड्डाणपुलाला मोठे छिद्र
हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्ग 44 वरील नांदगाव चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाच्या बांधकामाला दोन वर्षे झाले. हैद्राबादला जोडणाऱ्या या राष्ट्रीय मार्गावर वाहनांची कायम वर्दळ असते. मात्र, दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या या उड्डाण पुलाला मोठे छिद्र पडले असून हे छिद्र अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. आजवर अनेक जणांचे यात अपघात झाला असून या सर्व अपघाताला कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. या कंत्राटदारावर त्वरित कारवाई करा. अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांनी दिला आहे.
चौकशी करून दोषींवर कारवाई करावी- अतुल वांदिले
या महामार्गाने येता जाता वाहनधारकांना हा खड्डा चुकवताना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना खड्डा दिसत नसल्याने अनेकदा या महामार्गावर दुचाकींचे अपघात घडले आहेत.यादरम्यान अनेकदा या उड्डाणपुलाची डाग डुजी देखील करण्यात आली. मात्र आता तर या उड्डाणपुलावर आर पार मोठे भगदाड पडले आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरून असंख्य जड वाहने धावतात. मात्र हे मोठे भगदाड पडले असताना अद्याप त्यावर संबंधित प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केलेले नाही.
हा एक सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून प्रशासनाने वेळीच याची दखल घ्यावी, तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन यावर नेमकी काय कारवाई करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या