Vidarbha Rain Update : नागपूरसह विदर्भात पावसाची संततधार! सात जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
Vidarbha Rain Update : विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसह पश्चिम विदर्भातील अमरावती अशा एकूण 7 जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Vidarbha Rain Update : राज्यातील बहुतांश भागात दमदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली असून राज्यातील अनेक मोठे प्रकल्प, तलाव, नदी इत्यादि जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर पुढे आलेल्या माहितीनुसार, विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसह पश्चिम विदर्भातील अमरावती अशा एकूण 7 जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केले आहे.
जून महिन्यात विदर्भातील फक्त बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. मात्र जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे आता हवामान विभागाने विदर्भातील सात जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केल्याने दमदार पावसाची अपेक्षा आहे.
नागपुरात आज सकाळपासून पावसाची संततधार
दुसरीकडे, नागपुरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आज नागपूर सह पूर्व विदर्भातील सर्व सहा जिल्ह्यात तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण असून आज दमदार पावसाची अपेक्षा आहे.
भंडाऱ्यात रात्रीपासून पावसाची संततधार
काल रात्रीपासून भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झालीय. मागील तीन दिवसात जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली होती. मात्र, पाऊस पुन्हा सुरू झाल्यानं वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय. दरम्यान, हवामान विभागांना आज भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांनी सतर्क रहावं, असं आवाहन केलं आहे.
हे ही वाचा























