(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑनलाईन मिटिंगमध्ये बॉसकडून ज्युनिअरला शिवीगाळ, HDFC बँकेच्या अधिकाऱ्याचं निलंबन; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई
HDFC Bank Viral Video: काही दिवसांपूर्वी, एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो आपल्या ज्युनिअरशी गैरवर्तन करताना दिसत आहे.
HDFC Bank Employee Suspended: HDFC बँक (HDFC Bank) नं ऑनलाईन बैठकीत आपल्या ज्युनिअरसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या बँक अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी बँकेनं अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बँकेच्या मिटिंगमध्ये आपल्या ज्युनिअर एम्प्लॉईसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या मिटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बँकेतील एक अधिकारी बँकिंग आणि इंश्योरन्स प्रोडक्ट्सची विक्री न झाल्यामुळे ज्युनिअरवर ओरडत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी बँकेवर जोरदार टीका केली. तसेच, बँकेला ट्रोलही करण्यात आलं.
HDFC बँकेची कारवाई, अधिकाऱ्याचं निलंबन
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर कारवाई करताना एचडीएफसी बँकेनं गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. सोबतच या प्रकरणाचा खुलासा करताना बँकेनं सांगितलं की, आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही कारवाई करत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.
यासोबतच आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू, असं बँकेनं म्हटलं आहे. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल. यासोबतच कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचं बँकेनं स्पष्ट केलं आहे. यासाठी बँकेची झिरो टॉलरेंस पॉलिसी आहे. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानानं काम करण्याची संधी मिळावी, असा आमचा (बँकेचा) विश्वास आहे.
Toxic work culture isn’t limited to startups.
— Ravi Handa (@ravihanda) June 5, 2023
Apparently this is from HDFC Bank’s Kolkata branch. pic.twitter.com/1k5ICBUoIU
HDFC बँक सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
विमा पॉलिसी विकता येत नसल्यानं बँकेचा वरिष्ठ अधिकारी आपल्या ज्युनियरला ओरडत होता. ओरडता ओरडता तो ज्युनिअरला शिवीगाळ करण्यास सुरुवात करतो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर लोकांनी एचडीएफसी बँकेच्या वर्क कल्चरवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करताना बँकेनं अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.
प्रकरण नेमकं काय?
HDFC बँकेच्या एका डिपार्टमेंटची मिटींग सुरू होती. मिटिंग ऑनलाईन सुरू होती. या मिटिंगमध्ये एक ज्युनियर एम्प्लॉई त्याला दिलेलं टार्गेट पूर्ण करू शकला नसल्यामुळे एक वरिष्ठ अधिकाऱ्या त्याला ओरडत होता. पण बघता बघता अधिकाऱ्यानं ज्युनिअर एम्प्लॉईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरुन नेटकऱ्यांनी HDFC बँकेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली होती.