Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Non Veg Ban City India : पालिताना हे शहर जैन धर्माचे प्रमुख केंद्र आहे. या शहरात जैन धर्मियांचे 900 हून अधिक मंदिरे असल्याचं सांगितलं जातं. त्या ठिकाणी मांसाहाराला बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई : गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पालिताना शहरात (Palitana) आता मांसाहारी अन्नावर (Non veg Food Ban) पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार मटण, चिकन, अंडी, मच्छीसह सर्व प्रकारच्या मांसाहारावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानंतर फक्त शुद्ध शाकाहारी जेवण मिळणारे पालिताना हे जगातील पहिले शहर ठरले आहे. जैन साधूंनी केलेल्या दीर्घ आंदोलनानंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून देशभरात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.
पालिताना हे जैन धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. शहरातील शेत्रुंजय पर्वतावरील 900 हून अधिक संगमरवरी मंदिरे येथे आहेत. त्यामुळे हे जगातील एक अनोखे धार्मिक स्थळ मानले जाते.
Palitana Jain Pilgrimage Hub : पालिताना जैन धर्माचे प्रमुख केंद्र
गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेले पालिताना हे जैन धर्मीयांचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. येथे मांसाहार बंद करण्यासाठी 2014 मध्ये सुमारे 200 साधूंनी उपोषण केले होते. त्यावेळी शहरातील मटण-चिकन, अंड्यांची दुकाने बंद करण्याची मागणी जोरदार झाली होती. त्यानंतरही सातत्याने मांसाहारावर बंदी आणावी अशी मागणी जैन समूदायाकडून करण्यात येत होती.
Palitana Ban On Non Veg : नॉनव्हेजवर पूर्ण बंदी लागू
जैन समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करत राज्य सरकारने पालितानामध्ये मांस, अंडी विक्री तसेच पशुहत्येवर पूर्ण बंदी लागू केली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय जैन समाजासाठी मोठा विजय मानला जात असून शाकाहारी जीवनशैलीला मिळालेला मोठा पाठिंबा म्हणून पाहिले जात आहे. बंदीनंतर शहरात अनेक नवीन शाकाहारी रेस्टॉरंट्स सुरू झाले आहेत.
Vegetarian Only City In India : काहींचा विरोध कायम
पालितानामध्ये मांसाहारावर बंदी घालण्याच्या प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात काही गटांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हा निर्णय खाद्यस्वातंत्र्यावर मर्यादा आणतो आणि पर्यटनावरही परिणाम करू शकतो. कारण अनेक पर्यटक मांसाहारी भोजन पसंत करतात.
राजकीय पातळीवर पाहता भावनगरमध्ये भाजपचा प्रभाव मोठा असून पालिताना मतदारसंघातून भाजपनं अनेक वेळा विजय मिळवला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया 2002 मध्ये याच मतदारसंघातून आमदार राहिले होते.
ही बातमी वाचा:
























