(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral News : घटस्फोटानंतर पतीकडे नाही तर चक्क लग्नातील फोटोग्राफरकडे मागितले पैसे, नक्की काय घडलं?
Viral News : लग्नाच्या चार वर्षानंतर घटस्फोट झाल्याने लग्नातील फोटोग्राफरला फोटोचे पैसे एका महिलेने परत करायला सांगितले आहे. नक्की काय झालं सविस्तर वाचा.
Viral News : हल्ली लग्नाआधी (Marriage) बरीच हौसमौज करण्यात येते. लग्नाआधी तसेच लग्नानंतर देखील बऱ्याच हौसमौज केल्या जातात. मग त्या प्री-वेडींग, पोस्ट वेडिंग, डोहाळजेवण या सगळ्याचा समावेश असतो. या सगळ्यामागे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या एका अविस्मरणीय क्षणाला कायमचे एका फोटोमध्ये साठवून ठेवणे हा उद्देश असतो. त्यामुळे लग्नातील फोटो हा प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नंतरही लग्नातील फोटोग्राफरच्या (Photographer) संपर्कातही काही जण राहतात.
हल्ली लग्नानंतर घटस्फोटाचे (Divorced) प्रमाण देखील वाढत आहे. पण या घटोस्फोटाला देखील आताच्या काळात सकारत्मक दृष्टीने बघत असल्याचं चित्र दिसत आहे. घटस्फोटाकडून आपल्या पतीकडून पत्नी कायदेशीररित्या काही गोष्टींची मागणी नक्कीच करु शकते. परंतु पत्नीने तिच्या नवऱ्याकडे नाही तर लग्नातील फोटोग्राफरकडे फोटोचे दिलेले पैसे परत मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
नक्की काय घडलं?
या महिलेने आणि तिच्या पतीने 2019 मध्ये लग्नगाठ बांधली होती. पण लग्नाच्या चार वर्षानंतर या महिलेने तिच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतर लग्नातील कोणत्याच गोष्टींची आता गरज नसल्यानं तिनं थेट तिच्या लग्नातील फोटोग्राफर संपर्क साधून त्याच्याकडून लग्नातील फोटोसाठी दिलेले पैसे परत मागितले आहेत. या महिलेने व्हॉट्सॲपवरुन त्या फोटोग्राफरशी संवाद साधला. याचा व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत.
स्क्रीनशॉटमध्ये ती महिला म्हणते की, “तुला अजूनही मी आठवते की नाही हे मला माहित नाही. 2019 मध्ये डर्बनमध्ये माझ्या लग्नात तू फोटोशूट केले होते.” ती पुढे म्हणते, “माझा घटस्फोट झाला आहे आणि लग्नातील फोटोंची मला आणि माझ्या पतीला आता गरज नाही. तुम्ही त्यावेळी खूप छान काम केले. पण आता त्या आठवणी नको आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला त्या फोटोसाठी दिलेले पैसे परत करावे कारण आम्हाला आता त्या फोटोंची गरज नाही.” सुरुवातीला त्या फोटोग्राफरला हा विनोद वाटला त्यामुळे यावर तो त्या महिलेला विचारतो की, 'हा विनोद होता का?'. यावर ती महिला नाही म्हणते तेव्हा तो फोटोग्राफर पैसे परत करण्यास नकार देतो आणि त्या महिलेला म्हणतो की, 'पुन्हा ते फोटो माघारी घेऊ शकत नाही.'
बरं यावर त्यांचा संवाद थांबत नाही तर पुढे ती महिला त्या फोटग्राफरला म्हणते की, 'मी तुमच्याकडे पैसे परत मागू शकते, कारण मला या फोटोंची गरज नाही.' परंतु या गोष्टीसाठी त्या फोटोग्राफरने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर त्या महिलेने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. त्यावर त्या फोटो ग्राफरनेदेखील सहमती दर्शवली.
काही दिवसांपूर्वी झाली होती नव्या विचारांची सुरुवात
काही दिवसांपूर्वी चेन्नईत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या घटस्फोटाचे फोटोशूट केले आहे. आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्याचं दु:ख करत बसण्यापेक्षा या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून हटके अंदाजात या महिलेने घटस्फोटाचे फोटोशूट केले. घटस्फोटानंतर भारतीय स्त्रिया भावनिकदृष्ट्या तुटतात आणि नैराश्यात जातात. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिला सामान्य जीवनात परत येण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण ही जुनी विचारसरणी मोडीत काढण्यासाठी शालिनीने पुढाकार घेतला आहे.
परंतु आता झालेल्या घटनेवरुन हासण्याशिवाय लोकांकडे दुसरा कोणता पर्यायच उरत नाही. तसेच लग्नासाठी बऱ्याच गोष्टी आपण घेतो. कपडे, संसारासाठीच्या अनेक गोष्टी, सोनं यांसारख्या गोष्टींची खरेदी केली जाते. मग आता घटोस्फोटानंतर या गोष्टींसाठी खर्च केलेले पैसे देखील संबंधित दुकानात जाऊन लोकांनी परत मागितले तरी त्यात आश्चर्यकारक असं काहीही वाटणार हे नक्की.
UPDATE : pic.twitter.com/u66kMHqIPj
— LanceRomeoPhotography (@LanceRomeo) April 11, 2023
महत्त्वाच्या इतर बातम्या :