(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: रस्त्यावर फटाके फोडणं पडलं महागात; मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर
Viral Video: रस्त्यावर फटाके फोडताना आजूबाजूला पाहणं महत्त्वाचं असतं, पण काही लोक रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांचाही विचार करत नाहीत. याच निष्काळजीपणामुळे घडलेला एक प्रकार आता समोर आला आहे.
Viral Video: दिल्ली सरकारने (Delhi Government) फटाक्यांवर बंदी (Firecrackers Ban) घातली असूनही लोक तिथे फटाके फोडतात. दिवाळीला (Diwali) अजून वेळ असला तरी आतापासूनच फटाके फोडण्यास सुरुवात झाली आहे. फटाक्यांमुळे प्रदूषणाची (Pollution) पातळी तर वाढतेच, पण त्यामुळे लोक गंभीर जखमी होण्याचीही शक्यता असते. अशातच आता दिल्लीतील शास्त्री पार्कमधून एक धक्कादायक घटना समोर आली. फटाके फोडल्याने एका 11 वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
निष्काळजीपणामुळे मुलाला गंभीर दुखापत
या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये रस्त्यावर कोणीतरी फटाके फोडल्याने मुलाच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ज्या रस्त्यावरून तो जात होता त्या रस्त्यावर कोणीतरी फटाके लावले आहेत याची मुलाला कल्पनाही नव्हती. लहान मुलगा फटाक्याजवळून जात असतानाच त्याचा स्फोट झाला. डोळ्यात ठिणग्या उडाल्याने मुलाने डोळे घट्ट मिटून घेतल्याचं दिसतं. लहान मुलासोबत झालेल्या या अपघातानंतर एक मुलगा त्याच्या मदतीसाठी त्याच्या जवळ जात असल्याचंही दिसत आहे.
पोलिसांनी नोंदवला एफआयआर
फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, ही घटना 15 ऑक्टोबरच्या रात्री 8 वाजता घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. फटाक्यामुळे मुलाच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली. या घटनेच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 286 आणि 337 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
शास्त्री पार्क येथील रहिवासी असलेल्या या मुलाच्या बाबतीत मेडिको लीगल केस म्हणजेच MLC ऑल इंडिया मेडिकल हॉस्पिटलकडून प्राप्त झाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर कुणाचातरी जीव धोक्यात घालून निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#Delhi #BREAKING_NEWS
— Kunal Kashyap (@kunalkashyap_st) October 21, 2023
नॉर्थ ईस्ट दिल्ली में किसी ने पटाखा फोड़ा, जो नमाज पढ़कर घर लौट रहे 11 वर्षीय मासूम की आंख में जा लगा। एम्स में ऑपरेशन तो हुआ, मगर डॉक्टर ने कहा आंख की रोशनी नहीं आएगी। सीसीटीवी कैमरे में भी कैद हुई घटना। पुलिस केस दर्ज कर जांच में लगी।#CCTV#Delhipolice pic.twitter.com/Gx0RIol9vd
दिल्लीत फटाक्यांवर बंदी
मुलाच्या डोळ्यावर उपचार केल्यानंतर 17 ऑक्टोबरला त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतर रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दिल्लीत फटाक्यांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वितरण आणि फोडण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
हेही वाचा: