एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे आज नागपुरात पोहोचले होते. यावेळी, अमित शाह यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेचा समाचार घेत उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रहार केला.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालपासून सुरू असलेल्या वादात शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली. मला हिंदुत्त्व शिकवण्यासाठी अमित शाह, भाजप किंवा संघाची अजिबात गरज नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ज्यांनी आरोग्यसेवेची दुर्देशा केली, ज्यांनी मुंबई लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? असा टोला शिंदेंनी लगावला. तसेच, उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या शब्दात टीका केली. त्यावरुन, आता ठाकरेंचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) कडक शब्दात निशाणा साधला. शिंदेंनी थोडी लाज बाळगून टिका करायला हवी, असे आदित्य यांनी म्हटले.
हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे आज नागपुरात पोहोचले होते. यावेळी, अमित शाह यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेचा समाचार घेत उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रहार केला. तसेच, वंदे मातरमवर संसदेत झालेली चर्चा ही संघाची कपडे उतरवण्यासाठी होती का? असा सवालही विचारला.त्यानंतर, एकनाथ शिंदेंनी अमित शाहांच्या बाजुने खिंड लढवत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. आपल्या वडिलांवर केलेली टीका सहन न झाल्याने आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदेंनी थोडी लाज बाळगून टिका करायला हवी, यांना पहिलं आमदार मंत्री कोणी केलं? आत हेच विषारी साप आता अॅनाकोंडाला चावायला निघाले आहेत, अशा शब्दात आदित्य यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली.
पागडी निर्णयावरुनही पलटवार
मुंबईतील पागडी आणि सेस इमारतीसंदर्भात एकनात शिंदेंनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली. त्यानुसार, भाडेकरूंच्या ताब्यात जेवढे क्षेत्र आहे तेवढाच एफएसआय भाडेकरुंना मिळणार आहे. तर मालकाला भूखंड मालकीपोटी बेसिक एफएसआय देण्यात येईल, त्यासाठी इन्सेटिव्ह एफएसआय दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावरूनही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. आज पागडीच्या ज्या घोषणा झाल्या, मंत्र्यांना खातं कळत नाही, बिल्डरधार्जेना निर्णय मंत्र्यांनी घेतला आहे. यासाठी जबादार प्रशासन कोण? म्हाडा की बीएमसी? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यात पहिले 6 महिने जागा मालकाला, नंतर 6 महिने रहिवाशांना. त्यांनी विकासक आणावे आणि पुर्नविकास करावा. एसआएमध्ये रेरा कायदा झाला, तिथे 500 स्क्वेअर फूट जागा दिली आहेत, असे सांगत घाई-घाईत हे नेहमी निर्णय घेतात, असेही आदित्य यांनी म्हटले.
मुंढवा प्रकरणी सभागृहात प्रश्न मांडू
वृक्षतोड सगळीकडेच सुरूआहे, हे जंगलं संपवत आहेत म्हणून बिबटे नागरिक वस्तीत शिरत आहेत. भाजप जंगलं कापत आहे, तेच ह्याचं उत्तर आहे मंत्रिमंडळ फक्त विकासक आणि व्यापाऱ्यांच आहे, नागरिकांचं नाही. सभागृहात आता चर्चा सुरू आहे, किती मंत्री उपस्थित आहेत. मुंढवा प्रकरणी आम्ही उद्या सभागृहात प्रश्न मांडू, असेही आदित्य यांनी म्हटले.
हेही वाचा
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?






















