TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा शो पुन्हा रद्द
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा बंगळुरू येथे होणारा शो रद्द करण्यात आला आहे. मुनव्वरच्या 'डोंगरी टू नोव्हेअर' या शोला पोलिसांनी मान्यता न दिल्याने हा शो रद्द करण्यात आला आहे. पोलिसांची परवानगी न मिळाल्याने कार्यक्रम रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे.
चिरंजीवीच्या 'गॉडफादर'चा टीझर आऊट
सध्या अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. चिरंजीवीचा 'गॉडफादर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'गॉडफादर' हा सिनेमा 'लूसिफर' या ब्लॉकबस्टर मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे.
हृतिक रोशनच्या 'महाकाल की थाली'च्या जाहिरातीच्या वादात झोमॅटोने मागितली माफी
माफी मागून झोमॅटो कंपनीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, जाहिरातीमध्ये बोललेल्या महाकाल की थाली या शब्दाचा अर्थ 'महाकाल रेस्टॉरंट'चा होता, महाकालेश्वर मंदिराचा नव्हता. वास्तविक, झोमॅटोच्या या नव्या जाहिरातीत हृतिकने म्हटले आहे की, "मला भूक लागली होती म्हणून महाकालकडून थाळी मागवत आहे." या जाहिरातीत महाकालेश्वर मंदिराच्या नावाने हृतिक रोशनच्या जाहिरातीवरून गदारोळ झाला होता. हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
'देवमाणूस 2' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
'देवमाणूस' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. 'देवमाणूस 2' मालिकेत येणारे नव-नवे ट्विस्ट प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करत असतात. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे 'देवमाणूस 2' मालिकेचा चाहतावर्ग नाराज झाला आहे.
हजर होण्यासाठी रणवीरने पोलिसांकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली
न्यूड फोटोशूट प्रकरणी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह उद्या (22 ऑगस्ट) चौकशीसाठी मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहू शकणार नाही. त्याने याबाबत पोलिसांना कळवलं असून हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. आता चेंबूर पोलीस नवीन तारीख निश्चित करुन नवा समन्स पाठवतील. अभिनेता रणवीर सिंहने 'पेपर' या मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. मात्र त्याला हे फोटोशूट चांगलंच महागात पडल्याचं चित्र आहे.
मराठमोळ्या 'राडा'ला मिळालाय साऊथ स्टाईल टच
साऊथ स्टाईल कमालीची अॅक्शन आणि तरुणाईला भुरळ पाडणारा एक हँडसम हंक अभिनेता 'राडा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर चांगलीच हवा करत आहे. सोबत या चित्रपटाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे.
अक्षय कुमारच्या ‘कटपुतली’चा दमदार ट्रेलर रिलीज
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कटपुतली'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चाहते खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटात अक्षय पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी तो हत्येचे गूढ उकलत सीरियल किलरला पकडताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता, ज्यामध्ये हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी OTT वर प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
नागराज मंजुळेची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
नागराज मंजुळे एका संग्राम नावाच्या तरुणाचा कवितासंग्रह प्रकाशित करत आहे. नागराज मंजुळेला विक्रांतच्या कविता प्रचंड भावल्या. त्यामुळेच त्याने या कवितासंग्रहाचं प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला. आटपाडी प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून या कविता प्रेक्षकांना वाचायला मिळणार आहेत. या कवितासंग्रहावर भाष्य करणारी नागराजची पोस्ट सध्या चर्चेत आहे.
'बिग बॉस 16’साठी सलमान खानने मागितली ‘इतकी’ फी!
सलमान खानने बिग बॉसच्या 15व्या सीझनसाठी 350 कोटी रुपये फी आकारली होती. तर, आता त्याने नव्या सीझनसाठी तिप्पट फी मागितली आहे. म्हणजेच 'बिग बॉस 16'साठी अभिनेता सुमारे 1000 कोटी रुपये आकारणार आहे.
सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लायगर’ची मागणी
बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाला अलीकडेच सोशल मीडियावर बहिष्काराचा सामना करावा लागला. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. बॉलिवूडला गेल्या काही काळापासून ‘बॉयकॉट’ ट्रेंडचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात करण जोहरच्या प्रॉडक्शनचा ‘लायगर’ (हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. करण जोहरचा चित्रपट असल्याने आधीपासूनच ‘लायगर’ बॉयकॉट ट्रेंडला तोंड देत आहे. त्यातच विजय देवरकोंडा याने ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.