Nagpur: वाहन पार्क करताय! पण जरा सांभाळून, टोईंग व्हॅन कारवाई आजपासून, दंडही वाढला
नागपूर पोलिसांच्या टोईंग व्हॅन कंत्राट पद्धतीवर अनियमिततेचे आरोप झाल्यावर मागिल दोन वर्षांपासून बंद असलेली टोईंग कारवाई पुन्हा आजपासून सुरु झाली आहे. यामध्ये दुचाकी आणि चारचाकीचा दंडही वाढला आहे.
नागपूरः कंत्राट पद्धतीमधील अनियमिततेमुळे चर्चेत राहीलेली नागपूर पोलिसांची टोईंग व्हॅन कारवाई आता पुन्हा सुरु होत आहे. याची सुरुवात आजपासून झाली आहे. त्यामुळे आता शहरात कुठेही अस्ताव्यस्त वाहने उभी करणाऱ्यांची आता खैर नाही. बेशिस्त पार्क केलेल्या वाहनांवर कारवाईसाठी 10 टोईंग व्हॅन विविध झोनमध्ये फिरणार आहे. या अंतर्गत आता दंडही महागला आहे. दुचाकीसाठी 759.60 रुपये तर चारचाकीसाठी 1019.20 रुपये दंड आकारण्यात येईल. सध्या प्रायोगिक तत्वावर 9 पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात येणार असून भविष्यात शहरभर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टोईंग कंत्राट पद्धतीमध्ये अनियमितता असल्याचे आरोप झाल्यावर मागिल दोन वर्षांपासून अस्ताव्यस्त आणि नो पार्किंग झोनमध्ये उभी केलेली वाहने उचलण्याची कारवाई बंद करण्यात आली होती. यामुळे वाहतुकीच्या समस्या वाढत्या होत्या. आता शहर वाहतूक आणि महानगरपालिकेने आजपासून संयुक्त कारवाई करण्याची तयारी केली आहे. यापूर्वी नो पार्किंग झोनमधील दुचाकीला 200 रुपये आणि चारचाकी वाहनाला 500 रुपये दंड लावण्यात येत होता. परंतु आता नव्याने आकारला जाणारा दंड खिश्याला भारी पडणार आहे. या कारवाईची सुरुवात वाहतूक विभागाच्या सीताबर्डी, सदर आणि सोनेगाव झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरात करण्यात येत आहे. यात सीताबर्डी, धंतोली, अंबाझरी, सदर, गिट्टीखदान, मानकापूर, सोनेगाव, प्रतापनगर आणि बजाजनगर ठाण्यांच्या परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
पार्किंगसाठी जागा आहे का?
शहरात ठिकठिकाणी अनधिकृत विक्रेत्यांमुळे पार्किंगची जागा शिल्लक नाही. अनेक भागात पार्किंगची व्यवस्थाच नाही. त्यामुळे वाहने कोठे उभी करावीत, असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत. वाहने उभी करण्यासाठी शहरात पार्किंगचे बोर्ड लावलेले नाहीत. फुटपाथवर अनधिकृतरीत्या दुकान थाटणारेही वाहनचालकांना वाहने उभे करण्यास मनाई करतात. अशा स्थितीत वाहनचालकांना वाहन उभे करण्यासाठी भटकंती करावी लागते. या समस्येवरही तोडगा काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
व्हॅनमधील कॅमेरा घेणार फोटो
प्रत्येक टोईंग व्हॅनवर हायड्रोलिक मशीन, कॅमेरा लावण्यात आले आहे. कॅमेराला लावलेली डिव्हाईस सॉफ्टवेअरच्या मदतीने ई-चालान तयार करणार आहे. यामुळे कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता राहणार नाही. वाहनचालक टोईंग करण्यापूर्वी घटनास्थळी पोहोचल्यास त्यांना केवळ नो पार्किंगचे चालान भरावे लागणार आहे.