Bhiwandi Rain: भिवंडीत अवकाळी पावसाचा हाहा:कार! ग्रामीण भागातील घरांचे पत्रे उडाले; झाडं कोसळून 10 ते 12 जण जखमी
Unseasonal Rain: भिवंडी तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने हैदोस घातला आहे. सोसाच्याच्या वाऱ्याने अनेक घरांचे पत्रे उडाले, तर झाडं उन्मळून 10 ते 12 जण जखमी देखील झाले आहेत.
![Bhiwandi Rain: भिवंडीत अवकाळी पावसाचा हाहा:कार! ग्रामीण भागातील घरांचे पत्रे उडाले; झाडं कोसळून 10 ते 12 जण जखमी Unseasonal Rain in bhiwandi 10 to 12 people injured due to falling trees and roof Bhiwandi Rain: भिवंडीत अवकाळी पावसाचा हाहा:कार! ग्रामीण भागातील घरांचे पत्रे उडाले; झाडं कोसळून 10 ते 12 जण जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/7d098a58393d2ae68dd395e7997dff521685448961285713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhiwandi Rain: ठाणे जिल्ह्यातील (Thane District) भिवंडी तालुक्यात मंगळवारी (30 मे) दुपारच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला आणि अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पडघा-बोरिवली भागाला बसला आहे. या भागातील शेकडो घरांचे छप्पर उडून नागरिकांचा संसार उघड्यावर आला.
मुंबई-नाशिक महामार्ग मंदावला
अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तसंच शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर देखील अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत आणि महामार्ग मंदावला आहे.
दहा ते बारा जण जखमी
घरावरील पत्रे उडून तसंच झाडं पडल्याच्या घटनेत दहा ते बारा जण जखमी झाले असून उपचारासाठी जखमींना पडघा येथील गुज्जर हॉलमध्ये नेण्यात आलं आहे. भिवंडी तालुक्यातील शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.
विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब (Elecrticity Polls) देखील पडले आहेत, त्यामुळे परिसराचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे, तर दुसरीकडे वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी स्थानिक पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
वीट उत्पादकांचे नुकसान
ग्रामीण भागात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने ग्रामीण भागात वीट उत्पादक देखील हवालदिल झाले आहेत. अनेक वीट भट्टी मालकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर, तयार विटांवर प्लास्टिक टाकण्यात वीट उत्पादकांची मोठी धावाधाव झाली. वीटभट्टी मालकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्याने शासनाने वीटभट्टी मालकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वीट उत्पादकांकडून होत आहे.
ग्रामीण भागातील रस्ते जलमय
दरम्यान, मार्च महिन्यात 3 वेळा अवकाळी पावसाने भिवंडीतील (Bhiwandi) यात भागाला जोरदार झोडपले होते. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, पावसामुळे (Rain) पिकांसह फळबागांची नासाडी झाली होती. त्यानंतर, आता पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी रस्ते चिखलमय झाले आहेत. या चिखलमय रस्त्यातून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)