Ulhasnagar Crime : उल्हासनगरच्या विजयलक्ष्मी ज्वेलर्समधून 6 किलो सोन्याची चोरी, दुकान बंद असल्याचा फायदा घेत वॉचमनने साथीदारांसह सोनं लुटलं
Ulhasnagar Crime : विजयलक्ष्मी ज्वेलर्समधून तब्बल सहा किलो सोन्याची चोरी झाल्याची घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Ulhasnagar Crime : सांगली आणि जळगावमधील चोरीची घटना ताजी असतानाच मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) अशाच प्रकारची घटना घडली. विजयलक्ष्मी ज्वेलर्समधून तब्बल सहा किलो सोन्याची चोरी झाल्याची घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका वॉचमनने दुकान बंद असल्याचा फायदा घेत आपल्या साथीदारांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांचे दागिने (Jewellery) लंपास केले. चोरी करणारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
दुकान बंद असल्याचा फायदा घेत चोरी
उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथील शिरु चौकात विजयलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी या परिसरातील सर्व दुकानं बंद असतात. या बंदचा फायदा घेत वॉचमनने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने सोमवारी (26 जून) दुकान बंद झाल्यानंतर रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास दुकानात प्रवेश केला आणि ही चोरी केल्याचं उघड झालं आहे. चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करुन दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सोनं घेऊन चोरटे पसार झाले.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पोलिसांकडून शोध सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्यासह गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी तब्बल चार सिलेंडर आढळून आले आहेत. तर जवळपास सहा किलो सोने चोरीला गेल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. या गुन्ह्यातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या घटनेच्या तपासासाठी पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत.
सांगलीत रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा
सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्स या दुकानातून ४ जून रोजी भरदिवसा दरोडेखोरांनी कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने लुटले होते. या दरोड्यात सहा कोटी 44 लाख 300 रुपयांचा ऐवज लंपास झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी चारही बाजूंनी तपास सुरु ठेवला आहे. एलसीबीसह पोलिसांची पथके विविध ठिकाणी तपासासाठी रवाना झाली आहेत. दरम्यान सांगलील रिलायन्स ज्वेल्समधील दरोड्यातील चौघांची नावे निष्पन्न झाली आहेत. हे सर्व दरोडेखोर हैदराबाद, बिहार राज्यातील असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने लवकरच त्यांना अटक करु असा दावा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली. गणेश भद्रेवार (हैदराबाद), प्रताप अशोक सिंह राणा (वैशाली, बिहार), कार्तिक नंदलाल मुजुमदार (पश्चिम बंगाल) आणि प्रिन्स कुमार सिंग (वैशाली, बिहार) अशी या दरोडेखोरांची नावे आहेत.
हेही वाचा