(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane News : कोणतीही सूचना न देता दुचाकी उचलली, टोईंग कारवाईने ठाणेकर पुन्हा त्रस्त, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Thane News : टोईंग कारवाईमुळे ठाणेकर त्रस्त असतानाच सोशल मीडियावर ठाण्यातील टोईंग संदर्भातील आणखी एक व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
ठाणे : ठाण्यातील (Thane) उपवन भागातला एक व्हिडीओ वायरल झाला होता. ज्यामध्ये टोईंग (Towing) करणाऱ्या व्हॅनच्या ड्रायव्हरकडेच लायसन्स आणि पुरेशी कागदपत्रे नसल्याच्या दावा व्हिडीओ करणाऱ्याने केला होता. याबाबत अनेक उलटसुलट चर्चा होत होती. त्यानंतर वाहतूक विभागाकडून चालकावर आणि संबंधित नागरिकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. टोईंग कारवाईमुळे ठाणेकर त्रस्त असतानाच सोशल मीडियावर ठाण्यातील टोईंग संदर्भातील आणखी एक व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
चरई परिसरात नेमकं काय घडलं?
चरई परिसरामध्ये टोईंग व्हॅन एका शाळेच्या इथून जात होती. त्या ठिकाणी एका महिलेची दुचाकी नो पार्किंगमध्ये उभी होती. कोणत्याही प्रकारची सूचना न देता वाहतूक विभागाचे कर्मचारीनो पार्किंगमधील दुचाकी घेऊन जाताना महिलेला दिसलं. या दुचाकीवर महिलेच्या लहान मुलाची बॅग होती. ही महिला कर्मचाऱ्यांना गाडी नेण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तरीही वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गाडी पुढे घेऊन जात होते. त्यातच एका बाईकचालकाने हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केला.
वाहतूक विभागाकडून वाहन टोईंग करण्यासंदर्भात कोणतीही सूचना न देता दुचाकी उचलून घेऊन जातानाचा हा व्हिडीओ आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहेत.
पोलीस उपायुक्तांकडून घटनेची दखल
दरम्यान, ठाण्यामध्ये पुन्हा एकदा टोईंग व्हॅन संदर्भातील व्हिडीओ व्हायरल होताच वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी संबंधित घटनेची दखल घेतली. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे, त्या ठिकाणी टोईंग व्हॅनमधून अनाऊन्समेंट आणि कार्यवाही झाली होती, असा एक व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर शेअर केला. तसंच जर संबंधित घटनेत कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडून अनाऊन्समेंट झाली नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांनी स्पष्ट केलं.
गाड्या जप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच परवाना नसल्याचं उघड
काही दिवसांपूर्वी म्हणजे 18 ऑगस्ट रोजी ठाण्यातील उपवन परिसरातून नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या वाहतूक विभागाच्या ज्या लोकांकडून जप्त करण्यात येत होत्या, त्यांच्याकडेच कोणतीही परवानगी आणि त्यांचे स्वत:चे लायसन्स नसल्याचे उघड झालं होतं. लायसन्स घरी असल्याची सबब देखील या लोकांकडून देण्यात येत होती. त्यानंतर यावर आजूबाजूच्या लोकांनी देखील आक्षेप घेतला आणि त्या जप्त केलेल्या गाड्या सोडण्यास सांगितल्या. चेतन चिटणीस या एका जागरुक नागरिकाने हा संपू्र्ण प्रकार उघडीस आणला आहे.
हेही वाचा