Thane : एकीकडे हिंदू धर्मावर टीका करायची अन् स्वतः मात्र पितृपक्षात शनिशिंगणापूरला जाऊन कर्मकांड करायचं: आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका
Anand Paranjpe On Jitendra Awhad : स्थानिक लोकप्रतिनिधींचे गुंड पाण्यासाठी 30 ते 40 लाखांची खंडणी गोळा करतात असा आरोप अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी केला.
![Thane : एकीकडे हिंदू धर्मावर टीका करायची अन् स्वतः मात्र पितृपक्षात शनिशिंगणापूरला जाऊन कर्मकांड करायचं: आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका thane ncp anand paranjpe criticism on jitendra awhad of sharad pawar group on hindu religion history news update Thane : एकीकडे हिंदू धर्मावर टीका करायची अन् स्वतः मात्र पितृपक्षात शनिशिंगणापूरला जाऊन कर्मकांड करायचं: आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/1d2233a94ebe9bd0fb8520c569287a2e169764513765893_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे: जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणजे आपल्या सोईचा इतिहास आणि सोईचं धर्माचं विश्लेषण असं समीकरण आहे अशी टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्राला कायमच चुकीचा इतिहास, अर्धवट इतिहास, सोईचा इतिहास, खोटा इतिहास सांगत रहातात असंही ते म्हणाले.
आनंद परांजपे म्हणाले की, एखाद्या धर्माबद्दल चुकीचे बोलायचे, जातीबद्दल चुकीचे बोलायचे, धार्मिक आणि जातीय भावना भडकल्या जातील असे वक्तव्य करायचे हे जितेंद्र आव्हाड यांचे काम. लिंगायत समाजविरोधी वक्तव्य करायचं, सनातन धर्मविरोधी वक्तव्य करायचं, धनगर समाजाबद्दल बोलायचं, सनातन हिंदू धर्माविरोधात सतत बोलणे, खोटा इतिहास सतत सांगणे हा जितेंद्र आव्हाड यांचा स्थायीभाव आहे. ते स्वतः मात्र पितृपक्षात शनि शिंगणापूरला जाऊन कर्मकांडे करतात आणि हिंदू धर्मावर टीका करतात. हे इंटरपिटीशन म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड आहे.
हंडा मोर्चा हे आव्हाडांचे श्रेयाचे राजकारण
अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनीही यावेळी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. स्थानिक लोकप्रतिनिधीचे 16 गुंड कळवा पूर्व येथील लोकांकडून दर महिन्याला 30 ते 40 लाखांची खंडणी गोळा करतात, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी सांगितलं.
नजीब मुल्ला म्हणाले की, कळवा पूर्व येथे विघ्नहर्ता गणेशाच्या दर्शनाला गेल्यावर लोकांनी पिण्याच्या पाण्याविषयी आमच्याकडे तक्रारी केल्या. स्थानिक लोकप्रतिनिधींची लोक प्रत्येक कुटुंबाकडून बोअरवेलच्या पाण्यासाठी 500 रुपये गोळा करत असतात अशी माहिती दिली. याबाबत पोलिसांकडे शहनिशा केल्यानंतर पोलिसांच्या तपासात येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे 16 गुंड दरमहिन्याला लोकांकठून 30 ते 40 लाख रुपयांची खंडणी गोळा करत असल्याची माहिती दिली. ही खंडणी वसूल करणार्यांची नावे व यामागील सूत्रधार लवकरच जाहीर करणार.
कळवा पूर्व येथील भास्कर नगर, पौंडपाडा येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्तांकडे तत्काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन दिले असून स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत 240 कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेला देण्यात आले आहेत. या अमृत योजनेतुन कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावणार आहोत, ही बाब आमदार जितेंद्र आव्हाड यांना कळल्यानंतर गेली 14 वर्ष शांत बसलेले आव्हाड जागे झाले आणि शुक्रवारी कळवा पूर्व येथील नागरिकांच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून श्रेयाचे राजकारण करत असल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी केला.
गेली 14 वर्षे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी कळवा पूर्व नागरिकांसाठी प्रत्यक्षात काहीही केलेले नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस भास्कर नगर, पौड पाडा इथल्या पाणी प्रश्नावर मार्ग काढत असताना हंडा मोर्चा काढून दिखाव्याचे राजकारण करत फक्त श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शहर ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)