Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
Shahid Afridi on Gautam Gambhir: रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 351 षटकार मारण्याचा विक्रम मोडल्याबद्दल आफ्रिदीने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की विक्रम मोडण्यासाठी असतात.

Shahid Afridi on Gautam Gambhir : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहली आणि रोहित शर्माला जोरदार पाठिंबा दिला आहे. तो म्हणाला की, या दोन्ही दिग्गज खेळाडूंना भारतीय संघातून वगळण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, कारण ते भारतीय एकदिवसीय संघाचा कणा आहेत आणि 2027 च्या विश्वचषकापर्यंत खेळू शकतात. टेलिकॉम एशिया स्पोर्टला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदी म्हणाला की अलिकडच्या एकदिवसीय मालिकेत ज्या पद्धतीने या दोघांनी फलंदाजी केली त्यावरून स्पष्ट होते की ते संघाला दीर्घकाळ मजबूत करतील.
विक्रम मोडण्यासाठी असतात
शाहीद आफ्रिदी म्हणाला की, रोहित आणि कोहलीला मोठ्या स्पर्धांमध्ये आणि महत्त्वाच्या मालिकांमध्ये खेळवण्याचा सल्लाही आफ्रिदीने दिला. भारत कमकुवत संघांविरुद्ध नवीन खेळाडूंना आजमावू शकतो आणि या दोघांना विश्रांती देऊ शकतो. दरम्यान, रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 351 षटकार मारण्याचा विक्रम मोडल्याबद्दल आफ्रिदीने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की विक्रम मोडण्यासाठी असतात आणि आवडत्या खेळाडूने त्याचा विक्रम मोडला याचा आनंद आहे.
आफ्रिदीची गंभीरवर जोरदार टीका
आफ्रिदीने विराट आणि रोहितचे कौतुक करतानाच टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार टीका केली. आफ्रिदी म्हणाला की, सुरुवातीला असे वाटत होते की, गंभीरला वाटत होते की तोच एकमेव आहे जो बरोबर आहे, परंतु नंतर असे सिद्ध झाले की तुम्ही नेहमीच बरोबर नसता. दरम्यान, 2008 च्या आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळतानाच रोहितचा दर्जा पाहून तो एक दिवस भारतासाठी मोठा खेळाडू बनेल, असे जाणवल्याचे आफ्रिदीने यावेळी सांगितले.
रोहित आणि विराट कोहलीचे वर्चस्व कायम
दरम्यान, आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वर्चस्व कायम आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावणारा विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसीने क्रमवारी जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 302 धावा काढल्यानंतर मालिकावीर म्हणून निवड झालेल्या विराटला दोन स्थानांची वाढ झाली आहे. मालिकेत 146 धावा काढणाऱ्या रोहित त्याच्यापेक्षा फक्त आठ रेटिंग गुणांनी पुढे आहे. भारताचा पुढील एकदिवसीय सामना 11 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणार आहे. तेव्हा सर्वांचे लक्ष पहिल्या स्थानासाठी कोहली-रोहित यांच्या शर्यतीवर असेल. कोहलीव्यतिरिक्त, केएल राहुललाही एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत वाढ झाली आहे. राहुलने दोन स्थानांनी प्रगती करत 12 व्या स्थानावर झेप घेतली आहे. गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने तीन स्थानांनी प्रगती करत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























