Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Nagpur Forest Department : बिबट्याला घेऊन जाणारी वन विभागाची गाडी बंद पडल्याने शेवटी दुसरे मालवाहतूक वाहन बोलवावे लागले आणि बिबट्याला रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्यात आल्याचा प्रकार नागपूरमध्ये घडला.

नागपूर : वनमंत्री गणेश नाईक कितीही मोठमोठे दावे करत असले, तरी वन विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना घडली आहे. नागपूरच्या पारडी परिसरातील शिवनगरमधून मोठ्या प्रयत्नानंतर बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं. त्या बिबट्याला नेण्यात येणारी गाडी मात्र मध्येच बंद पडली. लोकांनी ती गाडी ढकलून पुढे नेली आणि नंतर दुसरे वाहन बोलावून त्या बिबट्याला रेस्क्यू सेंटरपर्यंत पोहोचवण्यात आलं. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नागपूरच्या पारडी भागात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर वन विभागाने घटनास्थळी येत, थरारक ऑपरेशन राबवत बिबट्याच्या मुसक्या आवळल्या. एक डार्ट मारल्यानंतर भिंतीवर चढून बसलेला बिबट्या 10 ते 12 फूट उंचीवरून खाली कोसळला. त्यानंतर त्याला रेस्क्यू सेंटरकडे नेण्यात आलं.
Nagpur Leopard :वन विभागाची गाडी बंद पडली
वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या खास वाहनात पिंजरा ठेवून रेस्क्यू सेंटर कडे टीम निघाली असताना पारडी परिसरामध्येच त्यांची रेस्क्यू वॅन बंद पडली त्या गाडीची क्लच प्लेट खराब असल्यामुळे ती पुन्हा सुरू झाली नाही. त्या रेस्क्यू व्हॅनमध्ये बिबट्या असताना ही घटना घडली.
अखेरीस दुसरे मालवाहतूक वाहन बोलावून त्याच्यामध्ये बिबटचा पिंजरा ठेवून वन विभागाच्या रेस्क्यू सेंटरपर्यंत बिबट्याला नेण्यात आलं. तर रेस्क्यू व्हॅन ही धक्का मारून कर्मचाऱ्यांना न्यावी लागली.
नागपुरात आढळलेल्या बिबट्यासंदर्भात माहिती घेतल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानपरिषदेत सांगितलं. तर बिबट्यासंदर्भात विदर्भातील आमदारांची बैठक बोलवण्यात आली असून याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली.
Forest Department : बिबट्याचा मुद्दा विधिमंडळात गाजला
दरम्यान, बिबट्याचा मुद्दा विधीमंडळात देखील चांगलाच गाजला. जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंनी विधानभवन परिसरात बिबट्याचा वेश परिधान करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. जुन्नरसह राज्यात बिबट्याचा प्रश्न गंभीर झाला असून केवळ नसबंदी करून बिबट्याचा प्रश्न सुटणार नसल्याचं शरद सोनवणेंनी सांगितलं. बिबट्यासाठी पिंजरे लावून काही होणार नसून रेस्क्यू सेंटर उभारून हा प्रश्न तात्काळ सुटेल असं शरद सोनवणे म्हणाले.
दरम्यान, बिबट्यासंदर्भात केलेले आंदोलन पक्षविरहित असल्याने सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली. जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी बिबट्याच्या विषयावर केलेल्या आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे न घेता केवळ सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. परंतु हे आंदोलन पक्षविरहित असल्याने सत्ताधारी किंवा विरोधक असा कोणताही भेदभाव न करता, सरसकट सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी केली.
ही बातमी वाचा:























