Sharad Pawar : शरद पवार माढ्यामधून लोकसभा लढवणार? 'असं' आहे पवार आणि माढ्याचं राजकीय गणित
Madha Lok Sabha Election : एकेकाळी राष्ट्रवादीसाठी बारामतीनंतर (Baramati) सर्वात सुरक्षित मतदारसंघ कोणता असं विचारल्यास माढ्याकडे बोट दाखवलं जायचं. आता मात्र राजकीय परिस्थिती बदलली आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Election) निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यालयात माढा लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. 2009 सालच्या निवडणुकीत शरद पवार हे या मतदारसंघातून निवडून आले होते.
शरद पवारांनी राज्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये माढ्याचा आढावा घेताना कार्यकर्त्यांनी शरद पवारांनीच या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवावी अशी मागणी केली. या मतदारसंघातून 2019 सालच्या निवडणुकीमध्ये भाजपचे रणजितसिंह निंबाळकर (BJP Ranjit Nimbalkar) हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पवारांनी स्वतः निवडणूक लढवली तर हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात येऊ शकतो असं कार्यकर्त्यांचं मत आहे.
माढ्याची लढाई सोपी नाही (Sharad Pawar And madha Lok sabha Relation)
शरद पवारांनी 2009 साली बारामती (Baramati Lok sabha Election) सोडून माढा या मतदारसंघाताला पसंती दिली होती आणि त्या ठिकाणाहून निवडूनही आले होते. पण त्यावेळीची राजकीय परिस्थिती वेगळी होती. सोलापूर (Solapur NCP) हा जिल्हा त्यावेळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysingh Mohite Patil), विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर आणि इतर सर्वच नेते एकदिलाने पवारांच्या मागे उभे होते.
सध्याची स्थिती पाहता पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे अजित पवारांसोबत आहेत. मधल्या काळात ते राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. एकेकाळी या जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असणारे विजयसिंह मोहिते पाटील हे आता भाजपसोबत आहेत. विजयसिंह मोहिते पाटील हे 2014 साली मोदी लाटेतही या मतदारसंघातून निवडून खासदार झाले होते. नंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे ते भाजपमध्ये गेले. त्याचा मोठा फटका गेल्या निवडणुकीवेळी बसला.
पार्थ पवारांची चर्चा आणि राष्ट्रवादीत फूट
माढा हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी बारामतीनंतर सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जायचा. त्यामुळे 2019 साली या ठिकाणी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. या चर्चांमुळे राष्ट्रवादीतील मोहिते पाटील गट चांगलाच नाराज झाला. त्याची कुणकुण लागल्यानंतर शरद पवारांनी सावध भूमिका घेतली. स्वतः शरद पवार नसतील तर या ठिकाणी मोहिते पाटलांच्या घरात उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाचा फायदा भाजपने घेतला आणि त्यांनी थेट मोहिते पाटलांनाच पक्षात ओढलं. त्यानंतर या ठिकाणचं राजकीय समीकरण बदललं.
राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह, मोहिते पाटलांची ताकद आणि नरेंद्र मोदींचा चेहरा याचा मेळ बसल्याने माढ्यामध्ये 2019 साली भाजपने विजयी पताका फडकावली. या मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडून आले.
आता तर राष्ट्रवादीत उभी फूट
सध्या सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये केवळ अंतर्गत कलहच नाही तर उभी फुट पडली आहे. बहुतांश नेत्यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या जर अजित पवारांनी आपले उमेदवार उभे केलेच आणि त्यांना पार्थ पवारांना लोकसभेमध्ये निवडून आणायचं असेल तर तर माढ्यामध्ये भाजपच्या उमेदवाराला साथ दिल्याशिवाय पर्याय नाही.
या सर्व राजकीय साठमारीत सध्या तरी भाजपचं पारडं जडच दिसतंय. पण खुद्द शरद पवारांनीच माढ्यामधून लोकसभेच्या रिंगणात उतरायचं ठरवलं तर मात्र काहीसं वेगळं चित्र दिसण्याची शक्यता आहे. कारण आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरूवातीला, सर्वात पहिल्यांदा मंत्रीपद मिळाल्यानंतर शरद पवारांकडे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं. त्यामुळे सोलापूर असो वा माढा... या मतदारसंघातील नस आणि नस पवारांना माहिती आहे हे नक्की.
ही बातमी वाचा: