दोन महिन्यांपूर्वी बच्चू कडूंच्या हस्ते चेक पण अजूनही पैसे नाहीत; हक्काच्या पैशासाठी दिव्यांगांचे मीरा-भाईंदर पालिकेत आंदोलन
Mira Bhayandar Palika: आपल्या हक्काच्या पैशासाठी दिव्यांगानी मिरा भाईंदर पालिकेच्या कार्यालयात अनेक फेऱ्या मारल्या. तरीही पैसे काही मिळाले नाही. शेवटी आज दिव्यांगानी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला.
ठाणे : राज्य सरकारने गाजावाजा केलेल्या 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) या कार्यक्रमाच्या अंतर्गत मीरा भाईंदर पालिकेने (Mira Bhayandar Palika) दिव्यांगाना (Disabled People) चेक दिले होते, पण अजूनही ते वटले नव्हते. दिव्यांगांच्या प्रश्नावर सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेल्या चेकचे पैसे अद्याप न मिळाल्याने दिव्यांगांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आपल्या हक्काच्या पैशासाठी दिव्यांगांनी आज मीरा भाईंदर पालिकेच्या कार्यालयात आंदोलन केलं.
'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या अंतर्गत मिरा भाईंदरच्या पाच दिव्यांगाना दोन महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते डेमो चेक देण्यात आला होता. ते चेक घेताना त्याचे फोटो काढण्यात आले होते आणि मीडियातही त्याला प्रसिद्धी देण्यात आली होती.
या गोष्टीला दोन महिन्यापेक्षा अधिक दिवस होवूनही तो चेक वटलाच नाही. त्यामुळे दिवाळी तोंडावर आली असताना दिव्यांगाना या वेळची दिवाळी अंधारातच घालावी लागेल. त्यामुळे हताश झालेल्या दिव्यांगानी मिरा भाईंदर पालिकेच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं.
ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात 1 सप्टेंबर रोजी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. आपल्या हक्काच्या पैशासाठी दिव्यांगानी मिरा भाईंदर पालिकेच्या कार्यालयात अनेक वेळा फेऱ्या मारल्या. तरीही पैसे काही मिळाले नाही. शेवटी आज दिव्यांगानी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत दिव्यांगासाठी काय केलं त्याचा पाढा वाचला. तसेच काही दिव्यांगानी फॉर्म उशिरा भरल्याने या प्रक्रियेला थोडा उशीर होत असल्याचं सांगितलं.
ही बातमी वाचा :