मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
आपण जनतेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, गोड-गोड बोलताना म्हणून कोणाचं ऐकायचं काही कारण नाही, जनता हीच मालक आहे, ह्यांची कामे झाली पाहिजे.

नागपूर : "माझ्या राजकीय आयुष्यात माझ्याकडून आता चांगले रस्ते झाले आहेत, आता मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, कितींना सस्पेंड करतो याचा रेकॉर्ड माझ्या हातून झाला पाहिजे आणि यासाठी मी देशात हात धुवून मागे लागलो आहे", असे म्हणत पुन्हा एकदा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिलाय. यावेळी, नागपूर महापालिकेच्या आयुक्तांनाही त्यांनी चिमटे काढले. नागपूरात (Nagpur) मनपाच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. जनतेला शिक्षा होते, पण जे अधिकारी नियमानुसार वेळत काम करत नाहीत, त्यांचं काय करायचं? असा सवालही गडकरी यांनी उपस्थित केला.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे आपल्या बेधडक वक्तव्यामुळे आणि पारदर्शक कामगिरीमुळे सर्वपरिचीत आहेत. रस्ते, हायवे, उड्डाणपूल आणि द्रुतगती महामार्ग बनविण्यासाठी त्यांची देशभरात ओळख निर्माण झाली असून अधिकारी आणि ठेकेदारांनी कामचुकारपणा केल्यास ते त्यांच्यावर थेट कारवाईचा इशारा देतात. आता, होम ग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये महापालिकेच्या विकास कामाांच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी त्यांनी नागपूर आयुक्तांना चिमटे काढत, कामचुकार अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. आपण जनतेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, गोड-गोड बोलतात म्हणून कोणाचं ऐकायचं काही कारण नाही, जनता हीच मालक आहे, ह्यांची कामे झाली पाहिजे. जी व्यवस्था न्याय देत नाही, ती उखडून टाकली पाहिजे, असे परखड भाष्य नितीन गडकरी यांनी केले. "जी व्यवस्था सर्वसामान्यांना न्याय देत नाही, त्याला उखडून फेकले पाहिजे, मी काम केलं नाही तर मुर्दाबाद करणे तुमचा अधिकार आहे", असे म्हणत नागपूरच्या जनतेसाठी आपण काम करत असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं.
"मी गमतीने म्हणतो की नागपूर मनपा आयुक्तांना माझ्याविरोधात पुढील लोकसभा निवडणूक लढायची आहे. कारण, नागपूर मनपा आयुक्तांसारखा सहहृदयी माणूस आतापर्यंत इथं आला नाही, नेते अतिक्रमण थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि अधिकारी ते काढण्याचा. मात्र, इकडे उलटाच आहे" अशा चिमटा गडकरींनी काढला.























