Mumbai Crime News : मोखाडामध्ये पोलिसांची मोठी कारवाई; एमडी ड्रग्सचा 38 कोटींचा साठा जप्त, सुत्रधाराला अटक
Palghar Crime : पोलिसांनी मोखाडामधील एका फार्म हाऊसवर छापा मारत ड्रग्जचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 38 कोटी रुपये किंमतीच्या एमडीचा साठा जप्त केला आहे.
मिरा-भाईंदर : राज्यात मागील काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्जविरोधी कारवाईला वेग दिला आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यातील इतर ठिकाणीदेखील कारवाई सुरू आहे. पोलिसांनी मोखाडामधील (Mokhada) एका फार्म हाऊसवर छापा मारत ड्रग्जचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 38 कोटी रुपये किंमतीच्या एमडीचा (MD Drugs) साठा जप्त केला आहे. त्याशिवाय, या प्रकरणातील सुत्रधारालाही अटक करण्यात आली असल्याचे माहिती मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश अंबुरे (Avinash Ambure) यांनी दिली आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा क्रमांक-1 ने आज पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील फार्म हाऊसवर छापा टाकत एक मोठ ड्रग्सचं रॅकेट उद्धवस्त केलं आहे. यात 38 कोटी किमतीच्या अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय, सात आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात ड्रग्सच्या मुख्य सुत्रधाराला पकडून ड्रग्स बनवणारा कारखानाही पोलिसांनी उद्धवस्त केला आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा-1 ने 18 ऑक्टोबर रोजी भाईंदरच्या बी.पी. रोडवरील हॉटेल विन्यासा रेसिडेन्सी येथे धाड टाकून, सनी सोलेकर, विशाल गोडसे, दीपक दुबे आणि शहबाज शेवा यांच्याकडून 251 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्स जप्त केले होते. त्याचबरोबर आरोपी सनी सोलेकर याच्याकडून एक गावठी पिस्टल, दोन मॅगझिन, आणि 12 जिवंत राउंडस मिळाले. तसेच एक चार चाकी वाहन आणि दुचाकी देखील आढळून आली होती.
या प्रकरणाचा तपास करताना, गुन्हे शाखा पथकाला दिनांक 21 ऑक्टोबर रोजी तन्वीर चौधरी आणि गौतम घोष हा आरोपी सापडला. तन्वीरकडून पोलिसांना 102 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) ही मिळून आलं. गौतम याच्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात याचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखा युनिट-1 ने दिनांक 22 ऑक्टोबर रोजी मुख्य आरोपी समीर पिंजार याच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील त्याच्या फार्म हाऊसवर छापा मारला. त्यात या फार्म हाऊसमध्ये एमडी ड्रग्स बनवण्याचा कारखानाच सापडला. या कारखान्यात 18 हजार 100 ग्रॅम एमडी ड्रग्स तसेच हे ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारे रसायन, रासायनिक उपकरणे ही मिळून आले आहे. एकूण 38 कोटींच्या एमडी ड्रग्जसह 7 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असल्याची माहिती मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.
ड्रग्ज तयार करणारा सराईत गुन्हेगार
हॉटेल विन्यासा रेसीडन्सीमध्ये अटक केलेले चार आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. मुंबई आणि परिसरात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर यातील मास्टरमाईंड समीर चंद्रशेखर पिंजार हा हैदराबाद येथे एका केमिकल कंपनी काम करायचा. तेथेच त्याने एमडी ड्रग्स कसं बनवायच याच प्रशिक्षण घेतलं होतं. हैदराबाद मध्ये त्याच्यावर एक गुन्हा ही दाखल आहे. मोखाडयाच्या फार्म हाउस मध्ये हा मागील दीड ते दोन वर्षापासून एमडी ड्रग्ज बनवत असल्याची माहिती प्राथमिक तपासात पोलिसांना मिळाली आहे.