Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
भाजपमध्ये ती गेलेली आहे पण मी आज शिवसेनेत आहे. मला सांगितल्यानंतर ही माहिती मी शिवसेना पक्षप्रमुख यांना दिलेली आहे. तिने काय केले यावर मी काही बोलू शकत नाही.

मुंबई : अभिषेक असता तर हा प्रश्न आला नसता, अभिषेक आणि सून यात फरक आहे ना. मुलाचे आपण कधी ही कान धरू शकतो पण सूनबाईचे धरू शकत नाही. मी पाहिले आहे, आम्ही एकत्रित कुटुंबात आजही राहतो, घर कुटुंब राजकारण असे आम्ही कधी एकत्र केले नाही, असे म्हणत मुंबईतील (Mumbai) दहीसरचे शिवसेना नेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांना रडू कोसळले. विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर (Tejaswi ghosalkar) यांनी आज भाजपात (BJP) प्रवेश केला. त्यानंतर, एबीपी माझाशी बोलताना विनोद घोसाळकर यांचा कंठ दाटला होता.
भाजपमध्ये ती गेलेली आहे पण मी आज शिवसेनेत आहे. मला सांगितल्यानंतर ही माहिती मी शिवसेना पक्षप्रमुख यांना दिलेली आहे. तिने काय केले यावर मी काही बोलू शकत नाही. माझी सून असली तरी निर्णय घेण्याचा अधिकार तिला आहे. आज अभिषेक नाही, मी काही बोलू शकत नाही, असे म्हणताना विनोद घोसाळकर यांते डोळे पाणावले. अभिषेक हा मुंबई बँकेच्या निवडणुकीत दोन वेळा जिंकून आला, त्यांनतर आम्ही मागणी केली होती अभिषेकच्या जागी तिला घ्यावे. पण, एक वर्ष लागले होते त्यांना घेण्यासाठी त्याला कारण काय हे माहीत नाही. आमच्या घरातून दबाव नव्हता बाहेरून माहिती नाही, आता मला काही बोलायचं नाही, असे म्हणत घोसाळकर यांनी मुंबई बँक निवडणुकीतील संचालक पदावरूनही भाष्य केलं.
माझ्यासोबत काल संध्याकाळी माझ्या दोन्ही सुना, माझी पत्नी आम्ही सगळे बसलो. त्यावेळी, डॅडी मी असे करते असे तिने मला सांगितले. मी कुटुंबप्रमुख म्हणून जे काही सांगायचे ते सांगितले, पण दबाव आणता येत नाही. ती स्वतंत्र आहे ना, ती निर्णय घेऊ शकते. घेतलेला निर्णय आणि आता या क्षणाला काही बोलणार नाही, माझ्यासोबत तिने चर्चा केली मी काय सांगायचं ते सांगितले. त्यांतर, मी पक्षप्रमुख यांना तात्काळ सांगितले की, तेजस्वीने असा निर्णय घेतला आहे, असेही विनोद घोसाळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
महापालिका निवडणुका जाहीर होताच हा निर्णय असे नाही आहे. शिवसेना ही सत्तेसाठी नाही, बाळासाहेबांनी हे स्वत: म्हटले होते की, मी सत्तेवर लाथ मारतो. मीही आता या रांगेत बसलो आहे, जिथे दोन पक्ष एका घरात आहेत. कुटुंब पद्धती ही राजकारणाच्या अगोदर महाराष्ट्रात उद्योगांमध्ये विभक्त होत होती. मागील 10 वर्षांपासून हे राजकारणात सुरू झालेलं आहे. राजकारणची दिशा अशी सुरू झालेली असेल आणि ते आपल्यावर आले असेल तर आता मानावे लागेल, अशी खंतही घोसाळकर यांनी बोलून दाखवली.
सूनबाईचे कान धरता येत नाहीत - विनोद घोसाळकर
आम्ही घरात कधीच राजकारण करत नाही. पण आम्ही एकत्रित कुटुंबात आहोत माझी नातवंड आहेत. त्यामुळे, मला त्या रुममध्ये जावे लागेल, त्या दोन मुलांपासून मी दूर जाऊ शकत नाही. अभिषेक असता तर हा प्रश्न आला नसता, अभिषेक आणि सून यात फरक आहे ना. मुलाचे आपण कधी ही कान धरू शकतो पण सूनबाईचे धरू शकत नाही, असेही विनोद घोसाळकर यांनी म्हटले.























