Jaydeep Apte: जयदीप आपटेचं मित्रासोबतचं संभाषण व्हायरल, शिवाजी महाराजांच्या डोक्यावर खोक, मित्र म्हणाला सुरेख डिटेलिंग!
Shivaji Maharaj statue: शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे हा कल्याण येथील घरातून फरार झाला होता. पोलिसांनी जयदीप आपटेच्या पत्नीची चौकशी केली आहे. आपटेला शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न. जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
मुंबई: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरुन राज्यभरातील वातावरण तापले असतानाच आता या पुतळ्याबाबत आणखी एक वादग्रस्त गोष्ट समोर आली आहे. शिवरायांच्या या पुतळ्याच्या (Shivaji Maharaj Statue) कपाळावर शिल्पकार जयदीप आपटे याने खोक असल्याचे दाखवले आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जयदीप आपटे (Jaydeep Apte) आणि त्याच्या एका मित्रामधील संभाषणाचा दाखला दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, हे बघा हे जयदीप आपटे यांचं ट्विट आहे. त्यामध्ये जयदीप आपटे आणि त्याचा मित्र अनंत सहस्त्रबुद्धे यांच्यातील संभाषण आहे. अनंत सहस्त्रबुद्धे हा जयदीप आपटेने तयार केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कौतुक करत आहे. "सुरेख मस्त डिटेलिंग केले आहे, महाराजांच्या घावाची खूण शिल्पात दिसत आहे. त्यावर जयदीप आपटेने म्हटले की, पुतळा बनवताना पूर्ण अभ्यास करावा लागतो. तू पहिला आहेस, ज्याने ही गोष्ट ओळखली. बाकीच्यांना समजावून सांगावं लागतंय." जयदीप आपटेला काय समजावून सांगावं लागतंय, कृष्णा कुलकर्णीने महाराजांच्या डोक्यावर इथे मारलं होतं, हे समजावणार, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. शिवाजी महाराज यांच्या नाकाची ठेवण इतकी सुंदर होती आणि राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याचं नाक बघा.आमच्या महापुरुषाचा आणि दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा पुतळा असा बनवतात का? तुला त्या खुणेच्या डिटेलिंगंचं कौतुक, हे डिटेलिंग शिवरायांच्या नाकाबाबत, त्यांच्या डोळ्यात दिसायला पाहिजे होते, चेहऱ्यावर दिसायला पाहिजे होते. हा पुतळा आहे की मस्करी, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
नारायण राणेंबाबत आव्हाडांचं भाष्य
जितेंद्र आव्हाड यांनी नारायण राणे यांनी राजकोट किल्ल्यावरील राड्यावेळी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत भाष्य केले. हे काय नारायण राणेंचं पहिलं प्रकरण आहे का? नारायण राणे यांना ब्लड प्रेशरचा मोठा त्रास आहे. ते प्रेशरमध्ये येतात. प्रेशरमध्ये गेला तर ते काहीही बोलतात, त्याच्यामध्ये नारायण राणे काय भक्ती संगीत म्हणतील का मनाचे श्लोक म्हणतील काय वाटते? हा नारायण राणेंचा मूळ स्वभाव आहे. तो बदलणार नाही. महाराष्ट्रात जो राजकारण करतो आणि तो राजकारण पाहतो आणि प्रत्येकाला माहित आहे नारायण राणे कसा आहे आणि ते काय बोलतात.
जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटमध्ये काय म्हटलंय?
मालवणच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे हा फेसबुकवर आपल्या एका मित्राशी माजल्यासारखा बोलतो. त्याचा मित्रही याच्यासारखाच; पुतळ्याच्या डोक्यावर आठवणीची खूणही ठेवली आहेस, असे तो म्हणतो. त्यावर आपटे, " पुतळा बनवताना पूर्ण अभ्यास करावा लागतो." असे सांगतो. जर आपटेने पुतळा साकारताना हाच अभ्यास केला असता तर महाराष्ट्राला अपमानित व्हावे लागले नसते. या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले की आपल्या महाराजांवर वार करणाऱ्या अफजलखानाचा वकील कृष्णा कुलकर्णीच्या औलादी आजही जिवंत आहेत. कुलकर्ण्याने केलेला तो वार फक्त महाराजांवर नव्हता, तर तो वार स्वराज्यावर होता मराठी मनावरची न मिटणारी जखम म्हणूनच महाराजांनी आपल्या तलवारीने कुलकर्ण्याचे मुंडके छाटले, हा इतिहास आहे. परंतु,दोन मित्रांमधील फेसबुकवरील चर्चा आणि त्यामध्ये महाराजांच्या डोक्यावरील खुणेचा उल्लेख करून ती दाखवणे... किळस येते ! या आपटेला आपटावासा वाटतोय!!
आणखी वाचा