Thane: ISIS प्रकरणातील आरोपीच्या ठाण्यातील घरी NIAची छापेमारी, पुण्यातून केली होती अटक
Thane Crime: पुणे ISIS मॉड्युल प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या ठाण्यातील घरी एनआयएने झडती घेतली आहे, यात गुन्ह्यातील साहित्य देखील जप्त करण्यात आलं आहे.
Thane Crime: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी (17 ऑगस्ट) पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणातील अटक आरोपी शमिल साकिब नाचन याच्या ठाण्यातील पडघा येथील घरावर छापा टाकला आहे. देशातील शांतता आणि सलोखा बिघडवण्याच्या दहशतवादी संघटनेच्या कटाचा पर्दाफाश एनआयएने केला आहे, यात अपराधाशी संबंधित अनेक साहित्य देखील जप्त करण्यात आले आहेत.
आरोपी शमिलच्या घरातून अनेक साहित्य जप्त
ISIS स्लीपर सेलचा सदस्य असलेल्या शमिलच्या ठाण्याच्या पडघा येथील घरावर झडती घातली असता घरात अनेक मोबाईल फोन, हार्ड डिस्क आणि काही हस्तलिखित कागदपत्रं मिळाली, ज्यांची तपासणी आणि विश्लेषण केलं जात आहे. शमिलला यापूर्वी बॉम्ब (IED) असेंब्ली आणि प्रशिक्षण कार्यशाळेत भाग घेतल्याबद्दल आणि सुधारित स्फोटक उपकरणं (IEDs) तयार करणं आणि चाचणी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.
देशात बॉम्बस्फोट करण्याचा होता कट
झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण या इतर पाच आरोपींसोबत शमिल हा काही अन्य संशयितांसोबत काम करत होता. IEDs बनवून आणि बॉम्बने स्फोट करून देशात एक मोठा कट रचण्याच्या प्रयत्नात ते होते.
दोन दहशतवाद्यांना एप्रिलमध्येच करण्यात आली अटक
फरार असलेले आणि एनआयएने 'मोस्ट वाँटेड' घोषित केलेले 'सुफा दहशतवादी टोळी'चे दोन्ही सदस्य इम्रान आणि युनूस यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. एप्रिलमध्ये राजस्थानमधील कारमधून स्फोटकं आणल्याप्रकरणी त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती.
गेल्या वर्षी घेतलं होतं बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण
पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणातील NIAच्या तपासात असं समोर आले आहे की, शमिल आणि ISIS स्लीपर सेलच्या इतर सदस्यांनी पुण्यातील कोंढवा येथील एका घरात IEDs एकत्र केलं होतं, तिथे त्यांनी सर्व कटाचं आयोजन केले होतं. गेल्या वर्षी त्यांनी एक बॉम्ब (IED) असेंब्ली आणि प्रशिक्षण कार्यशाळा घेतली होती. त्यांनी बनवलेल्या आयईडी बॉम्बची चाचणी घेण्यासाठी त्यांनी या ठिकाणी नियंत्रित स्फोटही घडवून आणले होते.
देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा उद्देश
देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्यं करण्याचा कट रचण्यात आला होता. देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने दहशत आणि हिंसाचार पसरवण्यासाठी आयसिसच्या अजेंड्याला (ISIS Agenda) पुढे नेण्यासाठी भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याची आरोपींची योजना होती.
या आहेत दहशतवादी संघटना
ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS)/ Daish/ इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक म्हणून देखील ओळखलं जातं. या सर्व दहशतवादी संघटना हिंसक कृत्यांमधून देशभरात दहशत पसरवून आपल्या भारतविरोधी अजेंड्यावर काम करत आहेत.
या संघटनेचे दहशतवादी मनसुबे आणि योजना हाणून पाडण्यासाठी एनआयए भारतभर व्यापक छापे टाकत आहे.
हेही वाचा: