Online Gaming : गेमिंग कंपन्यांकडून हजारो कोटीचा गंडा! कर चुकवेगिरी आणि क्रिप्टोच्या माध्यमातून हजारो कोटी देशाबाहेर
Gaming Companies Tax Fraud : परदेशी गेमिंग कंपन्या कर चुकवेगिरी करतात. यामुळे आतापर्यंत भारताला किती नुकसान झालं आहे? या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
मुंबई : गेमिंग कंपन्या भारतातील पैसा गुपचूपपणे परदेशात पाठवत असल्याचं समोर आलं आहे. यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जात असल्याचं उघडकीस आलं आहे. विदेशी गेमिंग कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी कर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दमछाक होताना दिसत आहे. कारण, या कंपन्या भारतात कमावलेले पैसे बाहेर नेण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करत आहेत. यासाठी शेल कंपन्यांचा आणि इतर माध्यमांचा वापर करत असल्याने देशाला कोट्यावधींचा फटका बसला आहे. दरम्यान, ह्या परदेशी गेमिंग कंपन्या कशाप्रकारे करतायत ही करचुकवेगिरी आणि आतापर्यंत भारताला याचं किती नुकसान झालं आहे? या संदर्भातील एक रिपोर्ट जाणून घ्या.
गेमिंग कंपन्यांकडून हजारो कोटींची कर चुकवेगिरी
स्मार्टफोनचा प्रसार जसा झाला त्याचप्रकारे भारतात वेगवेगळ्या ॲप्सचा प्रसार वाढला आहे. अशातच, गेमिंग ॲप्सनं बाजारात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये आज एकतरी गेमिंग ॲप डाऊनलोड केलेलं असेल. अनेक जण त्याच्या आहारी देखील गेली असली आणि त्या खेळासाठी अनेक पैसे देखील खर्च केली असतील आणि हेच तुमचे खर्च झालेल्या पैशातून ह्या गेमिंग कंपन्यांकडून कर चुकवेगिरी केली जात असल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम छोटी मोठी नसून तब्बल हजारो कोटींच्या जवळपास असल्याची माहिती जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने दिली आहे.
क्रिप्टोच्या माध्यमातून कशी होते करचोरी?
पारिमॅच ही ऑनलाइन स्पोर्ट्स बेटिंग कंपनी आहे. ज्याचे मुख्यालय सायप्रस देशात आहे. पारिमॅच कंपनीसाठी भारतात अनेक शेल कंपन्या काम करत असल्याची माहिती आहे. पारिमॅचसाठी शेल कंपन्यांमार्फत आतापर्यंत देशाबाहेर तब्बल 700 कोटी रुपये देशाबाहेर पाठवल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून यासंदर्भात कर यंत्रणा तपास करत होत्या, ज्यात गेमिंग कंपन्यांसंबंधी 400 जणांची चौकशी केल्यानंतर यासंदर्भातील रॅकेट समोर आलं आहे.
क्रिप्टोमार्फत मोठी रक्कम देशाबाहेर
क्रिप्टोमार्फत पाठवण्यात आलेली अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मात्र, यापूर्वीच मोठी रक्कम देशाबाहेर पाठवण्यात आल्याचं चौकशीत समोर आलं आहे. यासोबतच हा पैसा क्रिप्टोमार्फत पाठवण्यात आल्याने तो कुणाच्या वॉलेटमध्ये गेला आहे, हे देखील शोधणं कठीण आहे.
पैसा देशाबाहेर कसा जातो?
परदेशी गेमिंग कंपन्यांमार्फत भारतातील शेल कंपन्यांमध्ये पेमेंट ॲग्रीगेटर निवडला जातो. ज्या अॅग्रीगेटर कंपनीची नोंदणी असते किंवा विना नोंदणीची देखील कंपनी निवडली जाते. आता हे गेमिंग ॲप वापरणाऱ्या लोकांचा पैसा याच पेमेंट ॲग्रीगेटरमार्फत गोळा होतो आणि तो पुढे क्रिप्टोमध्ये रुपांतरीत करत दुबई आणि अखाती देशांमध्ये वळता केला जातो.
गेमिंग कंपन्यांवर आळा कसा घालणार?
भारतात अशा परदेशी गेमिंग कंपन्यांसाठी असंख्य शेल कंपन्या कार्यरत आहेत. मात्र, त्यांची कार्यालयं आणि नोंदणी मात्र परदेशात आहेत. परदेशातील कंपन्यांना भारताचे कर नियम लागू होत नाही. त्यामुळे कर चोरी करणं शक्य होतं. दरम्यान, याप्रकरणी केंद्र सरकारकडून गेमिंग कंपन्यांविरुद्ध कारवाई होताना दिसतेय. दुसरीकडे, सरकारकडून गेमिंग कंपन्यांवर 28 टक्क्यांचा जीएसटी कर लावण्यात आलाय. अशात, क्रिप्टोमार्फत कर चुकवेगिरी करणाऱ्या गेमिंग कंपन्यांवर आळा कसा घालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.