Mira Bhayandar : भाजपच्या महिला नगरसेविकांचे गोव्यातील डान्सचे व्हिडीओ व्हायरल, आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Mira Bhayandar Corporator Viral Video : भाजपच्या महिला माजी नगरसेविकांचे गोव्यातील डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाले असून ज्याने कुणी हे केलंय त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
ठाणे : मिरा भाईंदरमधील (Mira Bhayandar) माजी नगरसेविकांचे व्हिडीओ गोव्यातील डान्स (Goa Dance Video) करतानाचे खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर या नगरसेविकांनी नवघर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला आणि ज्याने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे त्याच्या विरोधात कारवाई करा अशी मागणी केली. भाजपच्या या माजी नगरसेविकांचे व्हिडीओ व्हायरल करण्यामागे पक्षाच्याच एका स्थानिक नेत्याचा आणि एका आमदाराच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
मिरा भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात 25 पेक्षा अधिक नगरसेविकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करुन घेराव घातला होता. मीरा भाईंदरमधील भाजपचे माजी नगरसेवक दोन दिवसीय गोव्याला गेले होते. या दौऱ्यात काही महिला नगरसेविका डान्स करत असल्याचे व्हिडीओ वायरल झाले आहे. हे व्हिडीओ वायरल करणाऱ्या व्यक्तीला अटक करा अशी मागणी त्यांनी यावेळी पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्याकडे केली आहे. यावेळी पोलीस ठाण्यात माजी महापौर जोत्सना हसनाले, डिंपल मेहता यांच्यासोबत सर्व नगरसेविका पोलीस ठाण्यात होत्या.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
कुणाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना काय वाटलं असेल, विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप या नगरसेविकांनी केला. ज्याने कुणी हे व्हिडीओ व्हायरल केले आहेत त्याच्यावर कारवाई करा, संबंधित व्यक्तीना अटक करा आणि गुन्हा दाखल करा, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा या नगरसेविकांनी घेतला.
मिरा भाईंदरच्या भाजपच्या या सर्व नगरसेविका गोव्याला गेल्या होत्या. त्या ठिकाणी पक्षाची चिंतन बैठक होती असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी बैठक झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातयं.
भाजपच्या या माजी नगरसेविकांचे गोव्यातील हे खासगी व्हिडीओ व्हायरल करण्यामागे भाजपच्या एका नेत्याचा आणि एका आमदाराचा हात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता कोणते राजकीय वळण मिळतंय हे पाहावं लागणार आहे.
ही बातमी वाचा: