(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kalyan News : माणुसकीसाठी धावून आली माणुसकी,नदीत बुडणाऱ्या मुलांना वाचवलं, पण तो गाळात अडकला, बेशुद्ध झाला, त्यानंतर...
Kalyan News : कल्याणमध्ये एका व्यक्तीने बुडणाऱ्या मुलांचे प्राण वाचवले पण तो स्वत: मात्र नदीतच बेशुद्ध झाला. त्याच्यासाठी रुग्णवाहिकेचा चालक मात्र देवदूत ठरला.
कल्याण : समाजात हल्ली माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. पण कल्याणमध्ये (Kalyan) माणुसकीचं दर्शन पाहायला मिळालं. नदीमध्ये बुडणाऱ्या चार मुलांना वाचवणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेचा चाल धावून आला. कल्याणमधील या घटनेचं सध्या सगळीकडे कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
नेमंक काय घडलं?
कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळ गावाजवळ असलेल्या उल्हास नदीमध्ये सकाळी काही मुलं पोहण्यासाठी उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने काही जण गटांगळ्या खाऊ लागली.त्यावेळी नदीकिनारी असणाऱ्या अनिल राक्षे या ग्रामस्थाला ही गटांगळ्या खाणारी मुले दिसली. त्याने क्षणाचाही विलंब न करता थेट नदीमध्ये उडी घेत या बुडणाऱ्या मुलांना बाहेर काढलं. मात्र या मुलांचा जीव वाचत वाचवताना अनिल नदीमध्ये असणाऱ्या गाळात जाऊन रुतला. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. आणि तो नदीमध्येच बेशुद्ध पडला.
दरम्यान त्याची पत्नी ही नदी शेजारीच कपडे धुवत होती. तिने हा सर्व प्रकार पाहिला आणि आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे काही लोकांनी नदीमध्ये बेशुद्ध झालेल्या अनिलला बाहेर काढण्यात आले. त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिका चालकाने मागचा पुढचा विचार न करता आणि कोणताही मोबदला न घेता अनिलला कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा येथील जी प्लस हार्ट हॉस्पिटलमध्ये आणले. एकंदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी देखील क्षणाचाही विलंब न करता आणि कागदपत्रांमध्ये वेळ न वाया घालवता अनिलला रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू केले.
अनिलच्या शरीरामध्ये तसेच मेंदूपर्यंत नदीचे पाणी गेले होते. या रुग्णालयाचे डॉक्टर अमोल चव्हाण आणि निलेश उपाध्याय यांनी आपल्या प्रयत्नांची शर्थ करत अनिलच्या शरीरातून सर्व पाणी बाहेर काढले. त्यामुळे अनिलला जीवनदान मिळालं. शरीरातून पाणी बाहेर काढल्यानंतरही अनिल तब्बल 26 तास बेशुद्ध अवस्थेत होता.मात्र सोमवार (16 ऑक्टोबर) रोजी सकाळी अनिलला शुद्ध आली. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांसह जी प्लस हार्ट हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल चव्हाण आणि डॉ.निलेश उपाध्याय यांनी सुटकेचा विश्वास सोडला.
दरम्यान डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच माझा भाऊ मृत्यूच्या दाढेतून परत येऊ शकला अशी प्रतिक्रिया अनिलच्या भावाने व्यक्त केली. तर आर्थिक परिस्थिती पाहून रुग्णालयानेही नाममात्र दरात अनिलवर उपचार केल्याबद्दल त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाचे मनापासून आभार मानले.स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बुडणाऱ्या मुलांना वाचवणारा अनिल असो की अनिलला रुग्णालयात घेऊन येणारा तो रुग्णवाहिका चालक असो.या सर्व घटनेतून माणुसकीसाठी माणुसकी धावून आल्याचे दुर्मिळ उदाहरण समोर आले आहे.
हेही वाचा :
Agriculture news : शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग, 10 गुंठ्यात 'करटूल्याची भाजी'; अशी साधली आर्थिक उन्नती