रेरा प्रकरणातील त्या बेकायदा इमारतीवर कारवाई करा, अन्यथा...., केडीएमसी आयुक्तांचे प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश
KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन काही बिल्डर व त्यांच्या हस्तकांनी महापालिकेच्या बांधकाम परवानग्या तयार केल्या.
KDMC : केडीएमसीचे बनावट शिक्के, सह्या वापरत बनावट परवानगीच्या आधारे रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळवणाऱ्या शासनाची व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या डोंबिवली व मानपाडा पोलिस ठाण्यात 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यात यावी, कारवाई केली गेली नाही,तर प्रभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आदेश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित तीन प्रभाग अधिकार्याना दिले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन काही बिल्डर व त्यांच्या हस्तकांनी महापालिकेच्या बांधकाम परवानग्या तयार केल्या. ज्या महापालिकेने दिलेल्याच नाही. त्याच परवानग्यांच्या आधारे त्यांनी रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. ही बाब वास्तू विशारद संदीप पाटील यांनी उघड केली. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महापालिकेने या प्रकरणात 65 बिल्डरांच्या विरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास एसआयटी करीत आहेत. दरम्यान रेराने ५२ बांधकाम प्रकरणात दिलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. मात्र ही फसवणूक महापालिका, राज्य सरकार आणि रेरा या तिन्ही प्राधिकरणांची आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त दांगडे यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी ज्या प्रभागांच्या हद्दीत ही बेकायदा बांधकामे झाली आहे. ज्यांच्या खोटय़ा बांधकाम परवानग्या तयार केल्या आहे. त्या प्रभागाच्या प्रभाग अधिकार्यानी महापालिकेच्या अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करुन कारवाईचा अहवाल तयार करण्याचे सूचित केले. आयुक्तांच्या आदेशापश्चात संबंधित प्रभाग अधिकार्यांकडून काही एक कार्यवाही झालेली दिसून येत नाही. त्यामुळे महापालिका आायुक्तांनी काल 10 नोव्हेंबर रोजी पुन्हा आदेश काढले आहेत. ज्या बेकायदा बांधकाम इमारतीत रहिवासी राहतात. त्या बांधकाम इमारती रहिवास मुक्त करण्यात याव्यात. तसेच ज्या बेकायदा बांधकाम इमारतीत रहिवासी राहत नाही. त्या इमारतीवर कारवाईचा हातोडा चालविण्यात यावा. या इमारती पाडण्यात याव्यात असे आदेश दिले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणी काही निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा दिसून आाल्यास संबंधित प्रभाग अधिकार्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
एसआयटीने फार्स आवळला आणखीन १६ बँक खाती गोठविली ,8 संगणक केले जप्त
बिल्डर फसवणूक प्रकरणी एसआयटीने पाच जणांना अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या पाच जणांकडून आठ संगणक जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर 16 बँक खाती गोठविण्यात आली आहे. यापूर्वी 40 बँक खाती गोठविण्याची कारवाई एसआयटीने केली होती. त्या पाठोपाठ आत्ता 16 बँक खाती गोठविण्याची कारवाई केली आहे. जप्त केलेल्या संगणकामध्ये फसवणूकी संदर्भातील डाटा तपासण्याचे काम सुरु आहे.