Kalyan : तुम मराठी लोग ऐसेही...मराठी युवकाचा अपमान करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांची मारहाण
Marathi Vs Non Marathi : तुम्ही मराठी लोक अशीच असता, असं अपमानाच्या हेतूने बोलणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.
कल्याण, ठाणे : मराठी आणि परप्रांतीय असा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. मुलुंडमध्ये मराठी दाम्प्त्याला कार्यालयाची जागा नाकारणे आणि कांदिवलीमध्ये मराठी व्यक्तीवर जय श्रीरामची घोषणा देण्यासाठी मारहाण करण्याचा प्रकार घडल्यानंतर आता कल्याणमध्ये आणखी वाद समोर आला आहे. तुम्ही मराठी लोक अशीच असता, असं अपमानाच्या हेतूने बोलणाऱ्या दोन परप्रांतीय फेरीवाल्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. कल्याणमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे.
नेमकं काय घडलं?
वाशिंद येथे राहणारा कैलास पवार हा विद्यार्थी कल्याणमध्ये काही कामानिमित्त आला होता. त्यावेळी त्याने कल्याण मधील फुटपाथवरील फेरीवाल्याकडून एक वस्तू विकत घेतली होती. मात्र, ती वस्तू खराब असल्याने तो विद्यार्थी पुन्हा कल्याणमध्ये आला आणि त्या फेरीवाल्याकडून ती वस्तू बदलून मिळण्यासाठी फेरीवाल्याकडे विनंती केली. मात्र, फेरीवाल्यांनी ती वस्तू बदलून देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर त्याने 'तुम मराठी लोक ऐसें ही होते हो' असे बोलून मराठी माणसाचा अपमान करण्याच्या हेतूने वक्तव्य केले.
या विद्यार्थ्याने कल्याणमधील मनसे कार्यकर्त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कल्याणमधील मनसे कार्यकर्त्यांनी त्या फेरीवाल्याला जोरदार चोप दिला. या घटनेवरून परप्रांतीय आणि मराठी वाद पुन्हा उफाळून आल्याचे दिसून येत आहे.
मुलुंडमध्ये काय झालं?
तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने मुलुंडमधील एका इमारतीत ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला. तृप्ती यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिक मुलुंडमधील संबंधित इमारतीत पोहोचले. जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला तृप्ती यांची माफी मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. त्यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी बुधवारी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपी प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांना अटक केली.
कांदिवलीत काय झालं?
जय श्री रामचा नारा दिला नाही म्हणून परप्रांतीयांच्या एका टोळक्याने मराठी युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना कांदीवली पूर्वमध्ये (Kandivali East) घडली आहे. या मारहाणीचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनाी दोन जणांना अटक केली असून इतर दोन जणांचा शोध सुरू आहे.
मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरातील गोकुळनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. परप्रांतीय तरुणांच्या चार जणांच्या टोळक्याने एका मराठी मुलाला 'जय श्रीराम'चा नारा देण्यास सांगितले. मात्र त्याने 'जय श्रीराम'चा नारा दिला नाही म्हणून या चार तरुणांकडून त्या मराठी मुलास बेदम मारहाण केली.