Kalyan News : ...म्हणून कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या चलचित्र देखाव्यावर पोलिसांकडून कारवाई
Kalyan News : कल्याणमधील विजय तरुण मंडळाने तयार केलेला देखावा चांगलाच चर्चेत होता. पोलिसांनी या देखाव्यावर आक्षेप घेत आज पहाटेच्या सुमारास त्यावर कारवाई करत सामुग्री जप्त केली. शिवसेनेतील बंडखोरीबाबतचा चलचित्र देखावा या गणेश मंडळाने तयार केला होता.
Kalyan News : सार्वजनिक गणेश मंडळांचं आकर्षण म्हणजे गणपतीची मूर्ती आणि देखावा. मुंबई आणि उपनगरातील प्रसिद्ध गणेश मंडळांपासून गल्लोगल्ली असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये विविध विषयावरचे देखावे साकारले जातात. परंतु कल्याणमधील (Kalyan) विजय तरुण मंडळाने तयार केलेला देखावा चांगलाच चर्चेत होता. पोलिसांनी या देखाव्यावर आक्षेप घेत आज पहाटेच्या सुमारास त्यावर कारवाई करत सामुग्री जप्त केली. शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरीबाबतचा चलचित्र देखावा या गणेश मंडळाने तयार केला होता.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा विजय तरुण मंडळाने निषेध केला आहे. देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हतं. या कारवाईविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असून निषेध म्हणून यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नाही, असं मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितलं.
जून महिन्यात विधानपरिषद निवडणूक पार पडली आणि निकाल लागताच शिवसेनेला मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेतील तब्बल 40 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. याशिवाय 11 अपक्ष आमदारांनी त्यांना साथ दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.
देखाव्यावर आज पहाटे कारवाई
कल्याणमधील विजय तरुण मंडळाचे यंदाचे 59 वं वर्ष आहे. मंडळात बहुतांश शिवसैनिक असून या शिवसैनिकांनी पक्ष निष्ठतेवर आणि शिवसेनेतील बंडखोरीबाबतचा चलचित्र देखावा यंदा गणेशोत्सवादरम्यान तयार केला होता. हा देखावा चर्चेचा विषय ठरला होता. या देखाव्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आक्षेप घेत या देखाव्यावर आज पहाटेच्या सुमारास कारवाई करत देखाव्याची सामुग्री जप्त केली.
विजय तरुण मंडळाकडून पोलिसांच्या कारवाईचा निषेध
या कारवाईचा विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी निषेध केला. ते म्हणाले की, "मंडळतर्फे प्रत्येक वर्षी संबंधित वर्षातील महत्त्वाच्या घडामोडींवर देखावा साकारला जातो. यंदा शिवसेनेतील फूट पडली, यावर देखावा साकारण्यात आला होता. देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हतं. पहाटेच्या सुमारास कारवाई केली. ही हिटलरशाही आहे. आम्ही या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागणार असून या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नाही."