![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Thane News: ठाण्यातील व्हेट क्लिनिकमध्ये संतापजनक प्रकार, कर्मचाऱ्याकडून पाळीव कुत्र्याला अमानुष मारहाण
Dog Beaten in Thane: असुरी हास्य करत कर्मचारी गोंडस कुत्र्याला मारत राहिला. ठाण्यातील घटनेचे सोशल मीडियावर संतप्त पडसाद. व्हेट क्लिनिकवच्या कर्मचाऱ्यावर पोलिसांची कारवाई
![Thane News: ठाण्यातील व्हेट क्लिनिकमध्ये संतापजनक प्रकार, कर्मचाऱ्याकडून पाळीव कुत्र्याला अमानुष मारहाण dog chow Chow brutally beaten at Vet clinic in Thane Maharashtra groomers arrested by police Thane News: ठाण्यातील व्हेट क्लिनिकमध्ये संतापजनक प्रकार, कर्मचाऱ्याकडून पाळीव कुत्र्याला अमानुष मारहाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/14/bcc95d005670bad0d8d05ee8b5516ca31707876638702954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे: ठाण्यातील आर मॉलजवळ असणाऱ्या वेटिक पेट क्लिनिकमध्ये एक संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी ग्रुमिंगसाठी आणण्यात आलेल्या एका श्नानाला क्लिनिकमधील दोन कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. ही घटना ७ ते ८ फेब्रुवारीच्या दरम्यान घडली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर अनेक प्राणीप्रेमी आणि सेलिब्रिटींनी या घटनेचा व्हीडिओ शेअर करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
प्राणीप्रेमींच्या रोषानंतर याप्रकरणी चितळसर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी व्हेटिक पेट क्लिनिकमधील दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. स्थानिक प्राणीप्रेमी वेटिक या क्लिनिकमध्ये आपल्या पशूंना उपचारासाठी आणि ग्रुमिंगसाठी नेतात. सात ते आठ दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याचे लग्न असल्यामुळे 'चाऊ चाऊ' जातीच्या श्वानाला वेटिक क्लिनिकमध्ये आणून सोडले होते. त्यावेळी मयूर आढाव या कर्मचाऱ्याने श्नानाला तोंडावर, पाठीत जोरदार बुक्के आणि लाथा मारल्या. त्याचा सहकारी असणारा प्रशांत गायकवाडने या घटनेचा व्हीडिओ चित्रीत केला होता. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काहीवेळातच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.
केवळ मौजमजेसाठी कुत्र्याला मारहाण
पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केल्यानंतर काही बाबी समोर आल्या आहेत. व्हीडिओमध्ये मयूर आढाव हा कर्मचारी कुत्र्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. त्याने प्रथम कुत्र्याच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला. त्यानंतर तो कुत्र्याच्या अंगावर जोरदार बुक्के मारत राहिला. वेदना सहन न झाल्यामुळे कुत्रा मदतीसाठी भुंकायला लागला. मात्र, मयूर आढाव त्याला बेदमपणे मारत राहिला. अखेर या कुत्र्याने टेबलवरुन खाली उडी मारत बाहेरच्या दिशेने पळ काढला. कुत्रा दरवाजातून बाहेर निघताना मयूरने त्याला पुन्हा त्याला लाथ मारली आणि खिदळत होता.
@PetaIndia this video from thane (maharashtra) dog Have beaten for snapchat post,take appropriate action against this culprit and do punish him early @ThaneCityPolice
— दिपक सैंदाणे (@DeepakSaindane8) February 13, 2024
pic.twitter.com/JsrksptZ4b
वेटिक पेट क्लिनिकचे स्पष्टीकरण
या प्रकारानंतर वेटिक पेट क्लिनिकच्या मालकांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, हा प्रकार आमच्यासाठी खूपच धक्कादायक आहे. एक पालक आणि प्राणीप्रेमी म्हणून हा प्रकार धक्कादायक आणि कदापि खपवून घेण्यासारखा नाही. याविरोधात आम्ही सर्वप्रथम दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. आम्ही प्राणीप्रेमी संस्थांच्या मदतीने याप्रकरणी पोलीस कारवाईसाठी पुढाकार घेतल्याचे वेटिक पेट क्लिनिकचे मालक गौरव अजमेरा यांनी सांगितले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)