(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kopari Bridge: ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका, कोपरी रेल्वे पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Thane Kopri Bridge : मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील कोपरी रेल्वे पुलाचं उद्घाटन करण्यात आले.
Thane Kopri Bridge Inauguration : ठाणे-मुंबई शहरांना जोडणाऱ्या कोपरी पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कोपरी पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA अंतर्गत तयार झाला आहे. कोपरी पुलामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात का होईना पण कमी होण्यास मदत होणार आहे. ठाणे, घोडबंदर, भिवंडी, नाशिक, कल्याण -डोंबिवली येथून चाकरमानी आणि प्रवाशी मोठ्या प्रमाणात या कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. मात्र अपुऱ्या पुलामुळे या पुलाजवळ आणि टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. मात्र हा पूल खुला झाल्यामुळे प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे.
मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने ठाणे शहरातील कोपरी येथे 2+2 पथ मर्गिकेच्या रेल्वे ओलंडणी पुलाचे 4+4 मार्गिका असे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामाकरता प्राधिकरणकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी 784 मीटर तर रुंदी 37.04 मीटर इतकी आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर हा 5+5 मार्गिकांचा आहे तर ठाणे शहारातील कोपरी रेल्वे ओलांडणी पुल हा 2+2 मार्गिकांचा होता, या अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे सकाळ व संध्याकाळच्या कालावधीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. सदर वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. 2+2 पथ मर्गिकेच्या पुलाचे 4+4 असे अपग्रेड केल्यामुळे मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होऊन फायदा पूर्व द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना होणार आहे.
या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेज पर्यंत महामार्गाखालून वाहानांच्या रहदारीकरीता 2+2 मार्गिकांचा 40 मीटर लांब आणि 21.2 मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्टेशनला जोडणारा वाहनांसाठी भूयारीमार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जलवहिनीची (स्ट्रॉम वॉटर ड्रेनची) सुविधा उपलब्ध करून देणारा बंधिस्त नाल्याचे सुधारीकारण देखील करण्यात आले आहे.
"कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जुना पूल हा अरुंद असल्यामुळे व्यस्त तासांत (पीक अवर्स) मध्ये वाहनचालकांना काही मीटरचा प्रवास करण्यासाठी 30 ते 40 मिनिटे लागतात. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा आता हा वेळ वाचणार आहे. त्यासोबतच तीन हात नाका परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे" असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवास म्हणाले.