Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
Iran : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याचं चित्र नसल्याचं संकेत मिळत आहेत. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी अमेरिका आणि इस्त्रायलला इशारा दिला आहे.

Iran नवी दिल्ली : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा संबोधन केलं. मोजतबा खामेनी यांनी पहिल्याच भाषणात अमेरिका आणि इस्त्रायल यांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की इराण त्यांच्या शहीद, प्रामुख्यानं युद्धात मारले गेलेल्या लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार आहे आणि शत्रूच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले सुरु राहतील, असा इशारा देखील मोजतबा खामेनी यांनी दिला.
आखाती देशात सुरु असलेलं युद्ध आता निर्णयाक आणि विनाशकारी टप्प्यावर पोहोचलं आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी पद स्वीकारल्यानंतर पहिल्या संबोधनात म्हटलं की 'आम्ही अल्लाहच्या नावावर हा शब्द देतो की शहिदांचा बदला घेतला जाणार आहे, प्रामुख्यानं जी मुलं अमेरिक आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात मारली गेली त्यांचा बदला घेणार आहे.'
मोजतबा खामेनी यांनी देखील हे स्पष्ट केलं की जगासाठी महत्त्वाचा असलेला सागरी मार्ग होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही स्थितीत बंद राहणार आहे. आम्हाला होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवावी लागेल. आम्ही आमच्या शेजारी देशांसोबत मैत्रीवर विश्वास ठेवतो, मात्र आमचं लक्ष्य केवळ दुश्मनांचे लष्करी तळ आहेत आणि त्यावरील हल्ले सुरु राहतील, असंही मोजतबा खामेनी यांनी म्हटलं.
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी म्हटलं की अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांचा बदला घेणं इराणची जबाबदारी आहे. आम्ही आमच्या शहिदांचं रक्त वाया जाऊन देणार नाही. प्रामुख्यानं मिनाबमध्ये शहीद झालेल्या लोकांच्या आणि लहान मुलांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल.
मोजतबा खामेनी यांनी त्यांच्या संबोधनाची सुरुवात अल्लाहच्या नावानं करुन त्यांनी इराण न्याय आणि शांततेच्या मार्गावर चालत राहील, असं म्हटलं. याचवेळी खामेनी यांनी शत्रूंविरुद्धच्या कारवाईतून मागं हटणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार आहे. या मार्गावरुन 20 टक्के तेलाची वाहतूक होते, यामुळं होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक ऊर्जा बाजारासाठी महत्त्वाची आहे.
अमेरिकन सैन्य तळ बंद करण्याचं आवाहन
मोजतबा खामेनी यांनी आखाती देशांमधील अमेरिकन सैन्य तळांवर निशाणा साधला. ते म्हणाले की या भागातील अमेरिकन सैन्य तळ बंद केले पाहिजेत. जर गरज पडली तर इराण त्यांच्या इतर सैन्य आणि प्रादेशिक क्षमता देखील सक्रीय करेल. यावेळी खामेनी यांनी इराणच्या सैन्य आणि सुरक्षा दलांचे आभार मानले. देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले.
खामनी यांनी म्हटलं की देशभरात आयोजित केल्या जाणाऱ्या रॅलीमध्ये जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि बाहेरच्या दबावासमोर झुकणार नसल्याचं दाखवून द्यावं. खामेनी यांनी सध्या सुरु असलेल्या संघर्षात इराणला त्यांच्या शत्रूंना पराभूत करावं लागेल. ही लढाई केवळ सैन्याची नसून राष्ट्रीय सन्मान आणि सुरक्षेची असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, मोजतबा खामेनी हे कॅमेऱ्यासमोर आले नाहीत. इस्त्रायलच्या गुप्तचर यंत्रणांकडून दावा करण्यात आला होता की ते जखमी झाले आहेत.






















