(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi: भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावर खड्ड्यांची चाळण; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
Bhiwandi Wada Manor Highway: रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे.
Potholes Issue: मनोर-वाडा-भिवंडी या महामार्गाची अवस्था अक्षरश: दयनीय झाली असून वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे (Accident) आक्रमक झालेल्या स्थानिकांनी गुरुवारी (10 ऑगस्ट) रास्ता रोको आंदोलन छेडलं. वाडा-भिवंडी महामार्गावरील कुडूस येथे हा महामार्ग स्थानिकांनी रोखून धरला. तब्बल दीड तासांपेक्षा अधिक काळ या महामार्गावर रास्ता रोको करण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली. आंदोलनावेळी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात वाढले
भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि ग्रामस्थांना अनेक समस्यांना समोरं जावं लागत आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे महामार्गावर असंख्य अपघात होत आहेत, यात काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काही प्रवासी आणि वाहन चालकांना कायमचं अपंगत्वही आलं आहे, त्यामुळे आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी कुडूस येथे हा महामार्ग रोखून धरला. यावेळी मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तीन महिन्यांपूर्वी ज्या ठेकेदारानं महामार्गाच्या दुरुस्तीचं काम केलं त्याच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
कोट्यवधी निधी खर्चून बनवलेला रस्ता धोक्याचा
मनोर-वाडा-भिवंडी या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी 58 कोटी रुपये निधी खर्च करून देखील आजही या महामार्गाची अवस्था दयनीय झाल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत. महामार्गावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत असून याचा मोठा त्रास येथील स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपये निधीचा खर्च वाया गेल्याची भावना येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे, त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली निधी खर्च केला जात असला तरी प्रत्यक्ष त्याचा फायदा येथील स्थानिक नागरिकांना आणि वाहन चालकांना होताना दिसत नाही.
बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या लागेबंधामुळे ही स्थिती
मनोर-वाडा-भिवंडी हा महामार्ग मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी महामार्ग म्हणून समजला जातो. 2021 ते आतापर्यंत या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तब्बल 58 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. तीन महिन्यांपूर्वी या महामार्गाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं. मात्र सध्या या महामार्गाची अवस्था 'जैसे थे'च पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस या महामार्गाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून अवघ्या तीन महिन्यांतच हा महामार्ग पुन्हा खड्डेमय झाला आहे. वारंवार तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग या महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे चांगले संबंध असल्याने हा महामार्ग खड्डेमय झाल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे .