(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ambernath: अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरण, पंढरीनाथ फडके यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी
Crime News: पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही अशी तक्रार महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांनी न्यायालयात केली आहे.
ठाणे: अंबरनाथमध्ये रविवारी झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांना उल्हासनगर न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह अटक करण्यात आलेल्या एकनाथ फडके आणि हरिश्चंद्र फडके यांनाही न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंबरनाथ शहरात रविवारी कल्याणच्या आडिवली गावातील राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. पनवेलचे पंढरीनाथ फडके यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी फडके यांच्यासह एकूण 32 जणांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. तर रात्री उशिरा पंढरीनाथ फडके, एकनाथ फडके आणि हरिश्चंद्र फडके या तिघांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली होती. या तिघांना आज उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत, आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान या घटनेत फक्त आमच्याच बाजूने नव्हे, तर राहुल पाटील यांच्या बाजूनेही आमच्यावर गोळीबार करण्यात आला, मात्र पोलिसांनी फक्त राहुल पाटील यांच्या तक्रारीवरून आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप पंढरीनाथ फडके यांनी केला. पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचं पंढरीनाथ फडके यांनी त्यांचे वकील अॅड. सत्यन पिल्ले यांच्यामार्फत न्यायालयाला सांगितलं. त्यावर न्यायालयाने पोलिसांचं म्हणणं मागवलं असून त्यानुसार आता पुढील कारवाई होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता परस्परविरोधी गुन्हे दाखल होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पनवेलचे पंढरीनाथ फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष असून राहुल पाटील हे कल्याणच्या आडीवली गावात राहणारे बैलगाडा मालक आहेत. या दोघांमध्ये मागील वर्षभरापासून बैलगाडा शर्यतीत जिंकण्या-हरण्यावरून सातत्याने वाद सुरू होते. दोन्ही गटाकडून अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांना आव्हानं दिली जात होती.
रविवारी अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ राहुल पाटील आणि पंढरीशेठ फडके हे समोरासमोर आले. यानंतर त्यांच्यात वाद होऊन पंढरीनाथ फडके समर्थकांनी राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी तब्बल 15 ते 20 गोळ्या झाडण्यात आल्याचं राहुल पाटील यांनी त्यांच्या तक्रारीत सांगितलं आहे. सोबतच राहुल पाटील यांच्या समर्थकांची गाडी सुद्धा फोडण्यात आली असल्याचं त्यामध्ये नोंद करण्यात आलं आहे.