ठाण्यात 9 वर्षाच्या चिमुकल्याचा हात भाजला, मुख्यमंत्र्यांनी स्वत: रुग्णालयात नेले, रॅली अर्ध्यावरच सोडली
शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात पोहोचली, मात्र रॅली सुरू असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी एक आई आपल्या जखमी मुलाचा हात हातात घेऊन रस्त्याने चाललेली दिसली
ठाणे : सध्या निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान परवा 7 मे रोजी होत आहे. तर, महायुतीतील तिढा संपुष्टात आल्यानंतर ठाणे, कल्याणसह (Kalyan) सर्वच जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणाही झाली. त्यात, महायुती व शिवसेनेकडून ठाण्यातून नरेश म्हस्के यांना, तर कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उेमदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली आज किसन नगर परिसरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या रॅलीला सुरुवात झाली असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या एक आगळा वेगळा अनुभव ठाणेकरांना पहायला मिळाला. हात भाजलेल्या चिमुकल्याला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वत: रुग्णालयात गेल्याचं ठाणेकरांनी पाहिलं.
शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात पोहोचली, मात्र रॅली सुरू असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी एक आई आपल्या जखमी मुलाचा हात हातात घेऊन रस्त्याने चाललेली दिसली. या आईच्या खांद्यावर एक मूल तर हातात दुसरे मूल होते. हातात असलेल्या मुलाचा हात गंभीररित्या भाजलेला असल्याने ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांनी त्या महिलेला पाहिले आणि त्या माऊलीची अडचण जाणून घेत ते रॅली सोडून तिच्या मदतीला धावून गेले. त्यांनी तत्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतले आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टराना त्या मुलाच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, यापूर्वीही अनेकदा मुख्यमंत्र्यांचा हा संवेदनशीलपणा महाराष्ट्राने पाहिला आहे. एका दौऱ्यावेळी अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णावाहिकेतून रुग्णालयात पाठवून त्यांनी रुग्णाची चौकशी केली होती. तर, डॉक्टरांनाही उपचारासाठी सूचना केल्या होत्या
रुद्रांश रोनीत चौधरी असे या नऊ वर्षाच्या मुलाचे नाव आहे. घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्याने त्याचा हात गंभीररीत्या भाजला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याला रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू झाले. सध्या तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री शिंदे पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे किसननगर परिसरात व ठाणे जिल्ह्यात त्यांच्या या कामाची चर्चा होत आहे.
हेही वाचा