गेल्या वर्षी हटवलेलं 'व्ह्यू अॅज पब्लिक' फिचर फेसबुकने पुन्हा आणलं
सुरक्षेत कमतरता असल्याने फेसबुकने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हे फीचर बंद केलं होतं. या फीचरच्या मदतीने एका हॅकरने जवळपास पाच कोटी यूजर्सचं टोकन चोरी केलं होतं.
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने गेल्या वर्षी सुरक्षेच्या कारणास्तव नव्याने सुरु केलेलं 'व्ह्यू अॅज पब्लिक' फीचर बंद केलं होतं. मात्र आता ते फीचर फेसबुकने पुन्हा आणलं आहे. या फीचरच्या माध्यमातून आपलं अकाऊंट इतर यूजर्सना कसं दिसतं हे पाहता येत होतं.
'व्ह्यू अॅज पब्लिक' हे एक प्रायव्हेट फीचर आहे. या फीचरच्या मदतीन यूजर आपलं प्रोफाईल दुसऱ्या यूजरच्या प्रोफाईलवरुन कसं दिसतं हे पाहू शकतो. फेसबुक फ्रेन्ड नसलेल्या यूजरला आपलं प्रोफाईल कसं दिसतं, हे देखली या फीचरच्या मदतीने पाहता येतं. द वर्जच्या रिपोर्टनुसार, या फीचरच्या मदतीने कोणती माहिती सार्वजनिक ठेवायची आणि कोणती माहिती खासगी ठेवायची याचा अंदाज यूजरला येण्यास मदत होते.
सुरक्षेत कमतरता असल्याने फेसबुकने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हे फीचर बंद केलं होतं. या फीचरच्या मदतीने एका हॅकरने जवळपास पाच कोटी यूजर्सचं टोकन चोरी केलं होतं. चोरी केलेल्या टोकन्सच्या मदतीने हॅकर अकाऊंट्समध्ये जाऊ शकत होता. या त्रुटीमुळे फेसबुकचे जवळपास 9 कोटी अकाऊंट्स सुरक्षित आहे की ना हे तपासण्यासाठी लॉग बॅक करावे लागले होते.