Google Drive च्या डेटा स्टोअरेजमध्ये मोठा बदल!
जर तुम्ही Google Drive चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. लवकरच डेटा स्टोअरेजबाबत मोठा बदल होणार आहे. आता गुगल ड्राईव्हमध्ये डिलीट केलेला डेटा फक्त 30 दिवसच सेव्ह राहणार असून त्यानंतर ट्रॅश डिलीट होईल.
मुंबई : जर तुम्ही गुगल ड्राईव्हचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. लवकरच गुगलमध्ये तुम्हाला मोठा बदल दिसणार आहे. आतापर्यंत तुम्ही संपूर्ण डेटा गुगल ड्राईव्हमध्ये स्टोअर करुन ठेवत असाल. याआधी फाईल डिलीट झाली तरी गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह राहायची. पण आता असं होणार नाही. होय, आता जी-मेलप्रमाणेच गुगल ड्राईव्हमध्ये ट्रॅश म्हणजेच डिलीट केलेल्या फाईल फक्त 30 दिवसांपर्यंत सेव्ह राहतील. यानंतर गुगल या फाईल्स डिलीट करणार आहे.
गुगलने एका ब्लॉगद्वारे ड्राईवच्या अपडेटबाबत माहिती दिली आहे. गुगलने म्हटलं आहे की, "आम्ही 13 ऑक्टोबर 2020 पासून रिटेन्शन पॉलिसीमध्ये बदल करत आहोत. यानुसार ट्रॅश फोल्डरमध्ये असलेल्या कोणत्याही फाईल 30 दिवसांनी आपोआप डिलीट होतील. ही पॉलिसी जी-सूट सोबत जीमेललाही लागू होईल."
सध्या गूगल ड्राईव ट्रॅशमधील फाईल्स कायम सेव्ह राहायच्या. पण आता 13 ऑक्टोबरपासून असं काहीही होणार नाही. आता फक्त 30 दिवसांपर्यंतच तुमचा डेटा सेव्ह राहणार. यानंतर गुगलही ड्राईवमधून तुमचा डेटा डिलीट करेल.
गुगलच्या मते नव्या अपडेटचा फायदा युझर्सना होणार आहे. आता युझर्स केवळ त्याच फाईल्स डिलीट करतील ज्या त्यांना खरंच डिलीट करायच्या आहेत. आपल्या नव्या पॉलिसीबाबत गुगल एक बॅनरही युझर्सना दाखवेल, ज्यामुळे ते जागरुक होऊ शकतील.
काही दिवसांपूर्वी गुगल ड्राईवमध्ये मोठा बग सापडला होता, ज्यामुळे हॅकर ड्राईवचा चुकीचा वापर करु शकत होते. या बगद्वारे हॅकर्स तुमचा फोनही हॅक करु शकतात. परंतु गुगलने वेळीच हा बग फिक्स केला होता.
गुगल ड्राईव ही ऑनलाईन फाईल स्टोअरेज सर्विस आहे. गुगल ड्राईव्ह अॅप्लिकेशनद्वारे तुम्ही कोणत्याही फाईल, फोल्डर, फोटो आणि व्हिडीओ ऑनलाईन सेव्ह करु शकतात. गुगल युझरला स्टोअरेजसाठी 15 जीबीपर्यंतचा मोफत स्पेस देतं. यानंतर गरज असेल तर युझरला गुगलकडून स्पेस खरेदी करावी लागते.