Vitthal Mandir : विठ्ठल मंदिराचे गर्भगृह , चौखांबी , सोळखांबी आले 700 वर्षांपूर्वीच्या मूळरूपात, सर्व धोके झाले दूर
Pandharpur : विठ्ठल मंदिरामध्ये (Vitthal Mandir) दुरुस्तीचे काम सुरु असताना समोर आलेले बहुतांश धोके आता पूर्णपणे दुरुस्त करण्यात आले आहेत.
Pandharpur : विठ्ठल मंदिरामध्ये (Vitthal Mandir) दुरुस्तीचे काम सुरु असताना समोर आलेले बहुतांश धोके आता पूर्णपणे दुरुस्त करण्यात आले आहेत. दरम्यान, देवाचे गर्भगृह , चौखांबी आणि सोळखांबी आता 700 वर्षांपूर्वीच्या मूळरूपात येऊ लागली आहे. मंदिराचे संवर्धनाचे काम करताना देवाच्या गर्भगृहात मूर्ती उभी असणाऱ्या चौथऱ्याला चिरा पडल्याचे समोर आले होते. याशिवाय मुख्यमंत्री (Chief Minister) ज्या चौखांबीमध्ये महापूजेसाठी संकल्प सोडतात त्याच्या छतावरील 8 फर लांबीची मोठी दगडी शिलाही चिरली होती. त्याशिवाय सोळखांबीतील अनेक खांबाचे दगड निसटू लागले होते. तसेच काही ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचेही निदर्शनास आले होते. याबाबत माझाने सविस्तर वृत्त दाखविल्यावर पुरातत्व विभागाने तातडीने याची दुरुस्ती हाती घेत हे सर्व धोके दूर केले आहेत.
दगडी खांब आणि दगडी छतावरील मूळ नक्षीकाम आले समोर
आता यामुळे मंदिराचे (Vitthal Mandir) गर्भगृहात मूळ रूपातील गडद गाभाऱ्यात देवाचे सावळे रूप खुली दिसत आहे. याशिवाय चौखांबी आणि सोळखांबी येथेही दगडी फ्लोरिंग , दगडी खांब आणि दगडी छतावरील मूळ नक्षीकाम समोर आले आहे. सध्या त्याठिकाणच्या दगडांना पॉलिशिंगच्या कमला आता सुरुवात होणार असून येथील सर्व दुरुस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर गर्भगृह , चौखांबी आणि सोळखांबी मधील दुरुस्ती पूर्ण झाल्याने आता सर्व धोके संपल्याचे मंदिर समिती सहाध्यक्ष गहिनीनाथ औसेकर (Gahininath Ausekar) यांनी सांगितले.
दगडी भिंतीला चांदी लावण्यास पुरातत्व विभागाचा नकार
आता मंदिरातील प्रमुख लाकडी दारणा चांदी लावण्यास पुरातत्व विभागाने परवानगी दिली असून भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणाऱ्या गरुड खांबही चांदी लावण्याची परवानगी समितीने मागितली आहे. या गरुड खांबाला भाविक मिठी मारून आपले साकडे सांगतात जे देवापर्यंत पोचते अशी वारकरी संप्रदायात मान्यता आहे. याशिवाय दगडी भिंतीला चांदी लावण्यास मात्र पुरातत्व विभागाने नकार दिलाय. यामुळे दगडाचे श्वसन थांबते, असे पुरातत्व विभागाने सांगितले. मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (Gahininath Ausekar) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील रूप मिळाले
सध्या विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहासह, चौखांबी, सोळखांबी याला 700 वर्षांपूर्वी असणारे म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील रूप मिळाले आहे. विठ्ठल मंदिरात पायावरील दर्शनाला वारकरी संप्रदायाची मान्यता असल्याने 2 जून पासून म्हणजे तब्बल 79 दिवसानंतर पुन्हा भाविकांना पायावर दर्शन घेता येईल असे औसेकर यांनी सांगितले. मंदिराच्या दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम अजून जवळपास दीड वर्षे सुरु राहणार असले तरी जो भाग पूर्ण झाला आहे त्या भागात भाविकांना जात येणार असल्याचेही औसेकर यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Pandharpur : मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत तीन लाख भाविकांची दाटी, विठुरायाचे Exclusive दर्शन माझावर..