अनोखा योगायोग! एकच गाव, एकच वर्ग, एकच बेंच आणि एकाच कॉलेजला मिळाला प्रवेश, आता एकाच वेळी होणार डॉक्टर, वडिलांच्या मैत्रीनंतर मुलांचींही नाळ घट्ट
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील एकाच वर्गातील दोन मित्रांना एकाच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यांचा एक अनोखा योगायोग आहे.
Solapur News: अलिकडच्या काळात मेडिकल क्षेत्रात (Medical Field) जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या क्षेत्रात मोठ्या संधी असल्यानं विद्यार्थ्यांचा याकडं कल आहे. या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप कष्ट करावे लागते. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील एकाच वर्गातील दोन मित्रांना एकाच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यांचा एक अनोखा योगायोग आहे. दोघांचेही एकच गाव, एकच शाळा, एकच वर्ग, एकच बेंच आणि एकाच मेडिकला कॉलेजला प्रवेळ मिळाला आहे. आता हे दोघे एकाच वेळी डॉक्टर होणार आहेत. विघ्नेश गव्हाणे (Vignesh Gavane) आणि राजवर्धन गुंड (Rajvardhan Gund) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे या दोघांचे वडिलही वर्गमित्र आहेत.
शासकीय अधिकाऱ्यांच्या गावात दोन डॉक्टर होणार
माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, माढा येथील सीबीएसई बोर्डाच्या आर्या स्कूलचे एकाच वर्गात शिकलेले विघ्नेश भास्कर गव्हाणे व राजवर्धन राजेंद्रकुमार गुंड हे दोन माजी विद्यार्थी गुणवत्तेच्या जोरावर डॉक्टर होणार आहेत. ते दोघेही शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी (Vitthalwadi) गावचे आहेत. विशेष म्हणजे या दोघांनाही एकाच वेळी एकाच मेडिकल कॉलेजमध्ये सोलापूर येथे प्रवेश मिळाला आहे. या दोघांनी देखील गावाचा नावलौकिक उंचावल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
दोघांचे वडीलही वर्गमित्रच
विघ्नेश गव्हाणे याने वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत 720 पैकी 620 गुण मिळवले आहेत, तर राजवर्धन गुंड याने 720 पैकी 618 गुण प्राप्त मिळवले आहेत. विशेष म्हणजे नीट परीक्षेसाठी मायनस गुण पद्धती आहे. त्यामुळं या दोन्ही गुणी व अभ्यासू विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे उज्ज्वल यश नक्कीच कौतुकास्पद आहे. या दोघांनाही मेडिकल प्रवेशाच्या पहिल्या फेरीत सोलापूर येथील अश्विनी मेडिकल कॉलेज, कुंभारी येथे प्रवेश मिळाला आहे. या दोघांचेही 10 वी पर्यंतचे शिक्षण माढा येथील आर्या पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. दोघांनीही नीट परीक्षेच्या तयारीसाठी लातूर येथील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये शिकवणी वर्ग लावले होते. विघ्नेशचे वडील भास्कर गव्हाणे हे म्हैसगाव येथील खासगी साखर कारखान्यात अकौंटंट विभागात कार्यरत आहेत. तर राजवर्धनचे वडील राजेंद्रकुमार गुंड हे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष बाब म्हणजे दोघांचे वडीलही वर्गमित्रच आहेत. या दोघांच्या वडिलांनी विठ्ठलवाडी आणि माढ्यात एकत्र शिक्षण घेतलं आहे.
विविध स्तरातून कौतुकांचा वर्षाव
दरम्यान, विघ्नेश गव्हाणे आणि राजवर्धन गुंड यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत, संचालक गणेश काशीद, डॉ.एकनाथ शेळके, डॉ. विनोद शहा, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे, डॉ. सुभाष पाटील यांनी या दोघांचं अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
NEET Exam Result: मोठी बातमी: नीट युजी परीक्षेचा रिझल्ट जाहीर, निकाल पाहण्यासाठी काय कराल?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI