(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur Rain : राज्यभर पाऊस पण सोलापूर जिल्हा अद्याप तहानलेलाच; माळशिरस आणि सांगोल्यात नऊ टँकर सुरू
Solapur Water Crisis : राज्यभरात पाऊस सुरू असला तरी सोलापुरात मात्र अद्याप पावसाने हजेरी लावली नाही, त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
सोलापूर: राज्यात सगळीकडे पावसाने हाहाकार उडवून दिल्याने ठिकठिकाणी महापूर आले असताना अजूनही सोलापूर जिल्हा मात्र तहानलेलाच असल्याचं चित्र आहे. माळशिरस आणि सांगोला तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नऊ टँकर सुरू ठेवावे लागत आहेत. यंदा पावसाने जिल्ह्याकडे सपशेल पाठ फिरविल्याने पेरण्या करणे तर दूरट, पण माणसांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
कमी पावसाचा फटका माळशिरस तालुक्यातील पूर्व भागाला जास्त बसला असून कायम दुष्काळी अशी ओळख असलेल्या या भागातील ग्रामस्थांना जगण्यासाठी आता स्थलांतर करायची वेळ येऊ लागली आहे. माळशिरस तालुक्यातील गारवाड , शिंगोर्णी, बचेरी, मगरवाडी, सुळेवाडी, भाम, माणकी, जळभावी, फडतरी, निरवेवाडी, लोंढेवाडी या अकरा गावात सध्या आठ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पाऊस नसल्याने विहिरी, ओढे, नाले, कोरडे, पडले असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत असल्याचे पिलीव येथील पिनू कदम यांनी सांगितले. शेतात पाऊस नसल्याने पेरणी नाही त्यामुळे जगायचे कसे हा प्रश्न या लोकांसमोर असून आपल्या सोबत पशुधन कसे वाचवायचे या चिंतेत या भागातील बळीराजा आहे. किमान पिण्याचे पाणी तरी घ्यावे यासाठी टँकरची वाट पाहत बसावे लागत असून यामुळे रोजंदारीला जाणेही कठीण बनू लागले असल्याचे सुळेवाडी येथील अनिल सोलंकर सांगतात .
कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोल्यात इटकी येथेही टँकर सुरु असून सैन्यदलातून एक महिना सुट्टीवर आलेल्या सचिन सावंत याला गावातील दुष्काळामुळे टँकरचे पाणी घेणे आणि जनावरांसाठी दूरदूरवरून जाऊन चार गोळा करणे हे काम लागल्याचे सचिन सांगतात. गोत्यात पशुधनाला ना चार आहे ना पाणी असे सांगताना राजन पाटील याना रडू कोसळले. अतिशय भीषण अवस्था दिवसेंदिवस बनत चालली असताना सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी अशी ओळख असलेल्या उजनी धरणात देखील सध्या केवळ उणे 10 टक्के पाणी आहे .
स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अक्कलकोटची अवस्था देखील अशीच चिंताजनक बनली असून येथील कुरनूर धरणात केवळ सात टक्के पाणीसाठा राहिला असून शहराला 10 ते 12 दिवसांत एकवेळ कसा तरी पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांनाही खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. निम्मा पावसाळा संपत आला असताना वरुणराजाने सोलापूर जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने या भागात दुष्काळाची टांगती तलवार आहे. अशात आता वेळीच पावसाळा सुरुवात न झाल्यास पुन्हा जिल्ह्यात टँकर आणि पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरु करायची वेळ येणार आहे. सध्या तरी जिल्ह्यातील बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला असून लवकरात लवकर जोरदार पाऊस येऊदे आणि आमची तहान भागू दे एवढीच विनंती सध्या देवाकडे करत आहेत.
ही बातमी वाचा: