Solapur: मद्यपी ट्रॅव्हल्स चालकांवर सोलापूर आरटीओचा वॉच; जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी आणि कारवाई
Solapur RTO: मद्यपी खासगी बस ट्रॅव्हल्स चालकांवरची कारवाई मोहीम सोलापूर पोलिसांनी अधिक तीव्र केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 18 नियम घालून देण्यात आले आहेत.
Solapur: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर राज्यात ठिकठिकाणी आरटीओतर्फे खासगी बसेसची तपासणी केली जात आहे. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खासगी बसेसची तपासणी केली जात आहे. सोलापुरात (Solapur) मागील दोन ते तीन दिवसात तीनशेहून अधिक खासगी बसेसची तपासणी करण्यात आली, यामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी 35 हून अधिक खासगी बसवर सोलापूर आरटीओ कार्यालयातर्फे कारवाई देखील करण्यात आली.
समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे, यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात आहे. सोलापुरातील सावळेश्वर टोल नाका, बार्शी टोल नाका, इंचगाव टोल नाका, नांदणी येथील तपासणी नाक्याजवळ आरटीओ अधिकाऱ्यांनी बसगाड्यांची तपासणी सुरु केली आहे.
काही दिवसांपूर्वी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन विभागाने खासगी बसचालक, बसमालक, सर्व मालवाहू वाहतूक संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास 18 सूचनांचे पालन करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले होते, या 18 सूचनांचे पालन प्रत्येकासाठी बंधनकारक असून त्याचे उल्लंघन झाल्यास वाहनाचे परमीट, चालकाचे लायसन्स आणि वाहन जप्त करण्याचा इशारा देखील आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
काय आहेत या 18 सूचना?
1) अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असावी.
2) स्पीड गव्हर्नर लावलेला असावा.
3) लाईट्स पूर्णपणे चालू असाव्या.
4) इंडिकेटर चालू असावे.
5) चालकाचा गणवेश असावा.
6) रात्रीच्या वेळी बॅक लाईटस चालू असावी.
7) परावर्तक असणे आवश्यक आहे.
8) हॉर्न असावा.
9) बसमधील प्रवासी क्षमता अतिरिक्त नसावी, तसेच वाहनचालक केबिनमध्ये प्रवासी नसावे.
10) आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असावा.
11) आपत्कालीन दरवाजाच्या ठिकाणी हातोडा असावा.
12) प्रवासाआधी प्रवाशांना सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती द्यावी.
13) वाहनमालकांनी वाहनचालकांची वेळोवेळी नेत्रतपासणी आणि आरोग्य तपासणी करावी.
14) मद्य प्राशन करुन वाहने चालवू नये. जर असे तपासणीदरम्यान आढळून आल्यास दुसऱ्या वाहन चालक उपलब्ध होईपर्यंत सदर वाहन सोडण्यात येणार नाही.
15) खासगी बसमधून मालवाहतूक करू नये.
16) मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करु नये.
17) बसेसची सर्व कागदपत्रे विशेषतः योग्यता प्रमाणपत्र आणि विमा अद्यावत असल्याची खात्री करावी.
18) बसमध्ये कोणतेही अनाधिकृत फेरबदल करु नये.
मद्यपान करून गाडी चालवाल तर जाल तुरंगात!
सोलापूर जिल्ह्यातील किमान 30% अपघात कमी करण्याचं उद्दिष्ट निश्चित करून आरटीओ विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकङून विशेष 3 पथकं नियुक्ती करण्यात आली आहेत. दक्षतेसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकङून मद्य प्राशन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार जोरदार कारवाई सुरु आहे. सोलापूर उपप्रादेशिक विभाग कार्यालयाकङून दारु पिऊन वाहन चालवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याच्या भारतीय दंङ विधान संहिता कलम 185 नुसार कारवाई आणि सहा महिने तुरुंगवास, तसेच 10 हजार रुपये दंङ अथवा दोन्ही शिक्षेस सामोरे जावे लागेल. त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी दोन वर्षे कारावास आणि 15 हजार दंङ किंवा दोन्ही शिक्षेस सामोरं जावं लागेल आणि वाहनचालकाचा परवाना/लायन्सस निलंबन करण्यात येईल, अशा सूचना सोलापूर उपप्रादेशिक विभाग कार्यालयाकङून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा:
Mumbai: खोट्या हजेऱ्या, खोट्या रजांच्या नोंदी... ताडदेव शस्त्रास्त्र विभागातील आठ पोलिसांचं निलंबन