Solapur News : कामाच्या पाहणीसाठी कंत्राटदाराकडून महापालिका आयुक्तांना आलिशान गाडी, आयुक्तांच्या गाडी वापरण्यावर माजी नगरसेवकांचा आक्षेप
Solapur News : कंत्राटदार कंपनीच्यावतीने सोलापूर महापालिका आयुक्त आणि तांत्रिक अधिकारी यांच्यासाठी दोन आलिशान गाड्या दिल्या आहेत. परंतु शासकीय गाडी असताना कंत्राटदार कंपनीने दिलेली गाडी का वापरावी? असा सवाल माजी नगरसेवक विचारत आहेत.
Solapur News : सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी (Solapur) सुरु असलेल्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाची नियमित पाहणी करण्यासाठी तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटदार कंपनीच्यावतीने महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) आणि तांत्रिक अधिकारी यांच्यासाठी दोन आलिशान गाड्या दिल्या आहेत. मात्र मनपा आयुक्तांकडे शासकीय गाडी असताना कंत्राटदार कंपनीने दिलेली गाडी का वापरावी? असा सवाल सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विचारत आहेत. यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होईल. त्यामुळे आयुक्तांनी अशा पद्धतीने गाडी स्वीकारणे योग्य नसल्याचे म्हणत महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी नाराजी देखील व्यक्त केली.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दुहेरी जलवाहिनीचे काम पोचमपाड कंपनीला देण्यात आले आहे. आधी हे काम पोचमपाड कंपनीलाच देण्यात आले होते. मात्र काम परवडणार नसल्याचे म्हणत पोचमपाड कंपनीने करार रद्द केले. त्यानंतर दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पुन्हा एकदा याच कंपनीला या कामाचं कंत्राट देण्यात आलं.
अनेक विघ्न पार करुन काही दिवसांपूर्वी दुहेरी जलवाहिनीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. या कामाच्या पाहणीसाठी तसेच नियंत्रणासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा स्मार्ट सिटीच्या सीईओ शितल तेली उगले आणि मुख्य तांत्रिक अधिकारी आणि पथकासाठी दोन गाड्या पोचमपाड कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. काम संपल्यानंतर या गाड्या कंपनीला परत करायच्या आहेत. मात्र आयुक्तांच्या या गाडी वापरणाऱ्यावरुन सोलापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पारदर्शकपणे हे काम पार पडेल का, याबाबत लोकांच्या मनात शंका येईल : आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक
सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना महापालिकेच्या ताब्यातील गाडीची सुविधा उपलब्ध आहे. असे असताना एखाद्या मक्तेदार कंपनीकडून देण्यात आलेली आलिशान गाडी आयुक्तांनी का वापरावी? असा सवाल माजी नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. आयुक्तांना दुहेरी जलवाहिनी कामाचे नियंत्रण करायचे आहे. पण अशा पद्धतीने कंत्राटदार कंपनीकडून गाडी घेतल्याने पारदर्शकपणे हे काम पार पडेल का याबाबतीत लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकतात, असे मत माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केले.
गाडी हवीच असेल तर महापालिकेच्या बजेटमधून खरेदी करा : चेतन नरोटे, माजी नगरसेवक
दुहेरी जलवाहिनीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप याआधी देखील अनेक वेळा झाला आहे. आता कुठे काम सुरु झालेले असताना पालिका आयुक्तांनी अशा पद्धतीने कंत्राटदार कंपनीकडून गाडी घेणे हे चुकीचे आहे. मी पंचवीस वर्षे झाली महानगरपालिकेच्या सभागृहात आहे. पण अशा पद्धतीने कधीही कंत्राटदार कंपनीकडून पाहणी आणि नियंत्रणाच्या नावाखाली कोणीही गाडी घेतल्याचे पाहिलेले नाही. आयुक्तांना जर गाडी हवीच असल्यास महापालिकेच्या बजेटमधून खरेदी करावी. विधान सल्लागार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आयुक्तांना सूचना करायला हव्या असे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक चेतन नरोटे यांनी व्यक्त केले.
दुहेरी जलवाहिनीच्या कामात भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी तर ही गाडी दिलेली नाही ना? - रियाज खरादी, माजी नगरसेवक
"दुहेरी जलवाहिनीचे काम हे आधी पोचमपाड कंपनीला दिले होते. पण त्यांनी असमर्थता दर्शवल्याने हे काम दुसऱ्या कंपनीला देण्यात आले होते. पण त्या कंपनीला बाद करुन टेंडर प्रक्रियेत सहभागी नसलेल्या पोचमपाड कंपनीला पुन्हा एकदा कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी तर ही गाडी दिलेली नाही ना? असा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो. या दुहेरी जलवाहिनीच्या कामांमध्ये जवळपास 60 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या सर्वांची चौकशी करण्यासाठी आम्ही CVC कडे तक्रार करणार आहोत." अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी दिली. या संदर्भात मनपा आयुक्त शीतल तेली-उगले यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.