Solapur IT Raids : गेल्या 30 तासापासून सोलापुरात आयकर विभागाची छापेमारी सुरु, बांधकाम व्यावसायिकांसह वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती रडारवर
सोलापुरात तब्बल गेल्या 30 तासांपासून आयकर विभागाची ( Income tax department) छापेमारी (Raids) सुरु आहे.
Solapur IT Raids : सोलापुरात तब्बल गेल्या 30 तासांपासून आयकर विभागाची ( Income tax department) छापेमारी (Raids) सुरु आहे. सोलापुरातील (Solapur) बांधकाम व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आयकरच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. काल सकाळी 7 वाजल्यापासून आयकरनं कारवाई सुरु केली आहे. अद्यापही तपासणी सुरुच आहे. एकूण सात ठिकाणी आयकर विभागाकडून तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या तपासात कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
सात ठिकाणी तपास सुरु मात्र, आयकर विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही
दरम्यान, कारवाईच्या संदर्भात आयकर विभागाने कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. काल जवळपास सात ठिकाणी आयकर विभागाच्या गाड्या दिसून आल्या होत्या. मात्र, आज गाड्या तिथून काढल्या आहेत. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकारी अद्याप तपास करत आहेत. घरांचे, कार्यलयांचे सगळे गेट लॉक करण्यात आले आहेत. सात ठिकाणांपैकी एक बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल आहेत. तसेच वैद्यकीय क्षेत्राशी देखील ते निगडीत आहेत. यासोबतच सोलापुरातल्या पाच हॉस्पीटलवर देखील छापेमारी करण्यात आली आहे. पण नेमकी ही छापेमारी का केली जात आहे? यामधून आयकर विभागाच्या हाती काय लागणार? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जो संकल्प केला, त्याचे पडसाद आता जिल्ह्या जिल्ह्यात उमटू लागले आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय. कारण महाराष्ट्रात एकामागोमाग एक सुरु धाडी सुरु आहेत. आधी जालन्यामध्ये आयकर विभागानं शेकडो कोटींची माया जप्त केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध शहरात एकाच वेळी 24 ठिकाणी छापे टाकले आहेत. यातले सर्वाधिक छापे पडले आहेत ते कारखानदार अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर. अभिजित पाटील यांच्या कारखान्यांवरील छापेमारीमुळं साखर कारखानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कुठे कुठे छापेमारी सुरु आहे
1) मेहुल कन्स्ट्रक्शन (सोलापूर)
2) अश्विनी हॉस्पिटल (सोलापूर)
3) अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी (सोलापूर)
4) व्यावसायिक बिपीन पटेलांच्या घरी (सोलापूर)
5) स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल (सोलापूर)
6) डॉ. अनुपम शाह हार्ट क्लिनिक (सोलापूर)
7) रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल (सोलापूर)
8) पंढरपूर- एका साखर कारखान्यावर छापा
9) नांदेड - एका ठिकाणी छापा
10) बीड- एका ठिकाणी छापा
11) उस्मानाबाद - दोन ठिकाणी छापेमारी
12) कोल्हापूर - एका ठिकाणी
महत्त्वाच्या बातम्या: