Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणूस आपल्याला मतदान करेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा असल्याने 15 तारखेला निवडणुका घ्यायच्या ठरल्या.

Raj Thackeray on BMC Election 2026: मुंबईचा विकास होईल. पण मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहण्याची गरज आहे. मुंबईचं वर्णन 'स्टेट विदिन स्टेट' असे केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई ही मराठी माणसाच्या (Marathi Manus) हातात आहे. पण भविष्यात हे चित्र पूर्णपणे बदलून टाकण्याच्या हालचाली सुरु असल्याचा दावा, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. ते शुक्रवारी एबीपीच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी भविष्यात संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा कसा बदलला जाऊ शकतो, याची सविस्तर मांडणी केली. (Mumbai Mahanagarpaliaka Election 2026)
मला 2024 ते 2025 यादरम्यान एक व्यक्ती भेटली होती. त्या व्यक्तीने मला मुंबईत आगामी काळात होऊ घातलेल्या गोष्टी आणि आराखडा ऐकून मी हबकून गेलो. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांना इतका उशीर त्यासाठीच झाला. कारण राज्य सरकारला काही गोष्टी या प्रशासकामार्फत करुन घ्यायच्या होत्या. निवडणूक होऊन दुसऱ्या पक्षाचे सरकार आल्यावर त्रास नको म्हणून या सर्व गोष्टी आधीच करायच्या होत्या. केंद्र आणि राज्य सरकारचा सर्व फोकस हा एमएमआरए रिजनवर आहे. याचं छोटसं उदाहरण मी सांगतो. वाढवण बंदर झालं, ती गरज होती, हे मी समजू शकतो. पण आता वाढवण बंदराच्या बाजूला एअरपोर्टही होत आहे. वाढवण विमानतळ कशासाठी बांधले जात आहे तर इथून मुंबईचा कार्गोचा सगळा भाग तिकडे शिफ्ट केला जाईल. यानंतर नवी मुंबई विमानतळ उभारण्यात आले आहे तिकडे सध्या मुंबईतून होत असलेली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक शिफ्ट केली जाईल. सध्या मुंबई विमानतळाचा प्लॉट अदानींच्या ताब्यात आहे. वाढवण आणि नवी मुंबई विमानतळामुळे या विमानतळाची गरज संपुष्टात येईल. तसे झाली की धारावी आणि कलिना परिसराला लागून असलेला मुंबई विमानतळाचा प्लॉट अदानींना विकला जाईल. आपण हा सगळा परिसर गुगल मॅपवर पाहिल्यावर लक्षात येईल की, या भागात शिवाजी पार्कसारखी 50 ते 60 मैदान बसू शकतात. तोच प्लॉट राज्य सरकार विकायला काढणार आहे. मला 100 टक्के वाटते, सध्याच्या मुंबई विमानतळाच्या जागेची विक्री होईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
बुलेट ट्रेनलाही माझा विरोध होता. बुलेट ट्रेन ही मुंबई, ठाणे आणि पालघर या मार्गाने जाणार आहे. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी मुंबईत भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईचा डीएनए गुजरातला मिळतो, असे विधान केले होते. या सगळ्याच्या खोलात गेल्यावर आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची पाळंमुळं दिसतील. तेव्हाही मुंबईतील व्यापाऱ्यांचा संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता, हे राज ठाकरे यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
Mumbai news: देवेंद्र फडणवीस हा बसवलेला माणूस, सांगेल त्या कागदावर सह्या कराव्या लागात: राज ठाकरे
मुंबई फक्त ठाकरेंच्या हातातच सुरक्षित का आहे, इतर पक्षांच्या हातात का नाही, असा प्रश्न यावेळी राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, होय मुंबई फक्त ठाकरेंच्या हातातच सुरक्षित आहे. मुंबई ही केंद्रशासित करण्याचा डाव 100 टक्के आहे. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे सहकारी असणारे जे महाराष्ट्रातील नेते आहेत, ही बसवलेली माणसं आहेत, बसलेली नाहीत. ठाकरेंच्या वरती कोणी नाही. त्यांना जे वरुन सांगितलं जाणार, ज्या कागदावर सह्या करायला सांगितल्या जाणार, तिकडे ते सह्या करणार. याचं उदाहरण म्हणजे देवनारचे डंपिंग ग्राऊंड अदानींना देण्यात आले. यांनी फक्त कागदावर सह्या केल्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
भविष्यात मुंबई महानगर प्रदेशात यांना ज्या गोष्टी करायच्या आहे, त्या महानगरपालिकांच्या परवानगीशिवाय करता येणार नाहीत. महानगरपालिका त्याला अटकाव करु शकतात. टाटा आणि बिर्लांनी अख्ख्या आयुष्यात जितकी संपत्ती कमावली नाही तेवढी संपत्ती अदानींनी फक्त टीडीआरमधून कमावली. धारावीच्या टीडीआरमधून अदानींना 4 लाख कोटींचा नफा होणार आहे. याशिवाय, मुंबई कोणी काय करायचे, या टीडीआरचे अधिकारही अदानींच्या हातात गेले आहेत, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
आणखी वाचा























