बोगस रासायनिक खत विक्री, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, कृषी विभागाची कारवाई; 11 लाखांचा साठा जप्त
शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या या प्रकारामुळे कृषी विभागाकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Solapur: पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात बोगस रासायनिक खत तयार करून शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने पोलिसांसह कारवाई करत विठ्ठल खत कारखान्यावर छापा टाकून तब्बल 11 लाख 12 हजार रुपयांचे बनावट खत जप्त केले. यावेळी 700 पोत्यांमध्ये हे खत साठवण्यात आलेले आढळून आले.
आकर्षक पॅकिंगमध्ये रासायनिक खताचे 700 पोते
कृषी विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे महालक्ष्मी फर्टिलायझर एलएलपी या कंपनीच्या वतीने विठ्ठल खत कारखान्यात बनावट खत तयार केलं जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुण नियंत्रण अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने कारखान्यावर छापा टाकला असता, विविध कंपन्यांच्या नावाने लेबल लावलेले आणि आकर्षक पॅकिंगमध्ये तयार करण्यात आलेले रासायनिक खताचे 700 पोते सापडले. जप्त केलेल्या खताचा अंदाजे बाजारमूल्य 11 लाख 12 हजार रुपये एवढा असून, ही संपूर्ण रक्कम बनावट खताच्या विक्रीतून कमवण्यात आली होती. शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या या प्रकारामुळे कृषी विभागाकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील सुदीप सुरेश साळुंखे, अहमदनगर जिल्ह्यातील हंडी निमगाव येथील योगेश बाळकृष्ण जाधव आणि पंढरपूरजवळील विठ्ठल खत कारखान्याच्या संचालकांविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपींविरोधात रासायनिक खत आदेश 1985 मधील नियमांचे उल्लंघन, तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 2, 3 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, आणखी काही आरोपींचा या रॅकेटशी संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.शेतकऱ्यांच्या श्रमांची लूट करणाऱ्या या बोगस खत विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे बनावट खत विक्रेत्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.



















