Solapur : सोलापुरात वसतिगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा, त्रास झाल्यानंतर दहा ते बारा विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल
Solapur Food Poison News : सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकच्या वसतीगृहातील ते 12 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे.
सोलापूर : सोलापूरमध्ये 10 ते 12 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. सिध्देश्वर वूमन पॉलिटेक्निक महाविद्यालयच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. काल रात्रीच्या जेवणानंतर आज सकाळपासून जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरु झाल्याची माहिती विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनाला दिली. यावेळी या सर्व विद्यार्थिनींना सोलापुरातील सिद्धेश्वर हॉस्पिटल आणि इतर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. मात्र या सर्व घटनेमागे नेमके कारण काय आहे? विद्यार्थिनींना त्रास कसा झाला? याबाबतची सखोल माहिती घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी सिद्धेश्वर वुमन्स पॉलीटेक्निक महाविद्यालयाच्या वस्तीगृहात दाखल झाले आहेत. वसतिगृहामध्ये उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थिनींचा जबाब पोलिसांकडून घेतला जात आहे.
पहाटेपासून सुरू झाला त्रास
सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकच्या या वसतीगृहामध्ये जवळपास 45 मुली राहतात. नेहमीप्रमाणे या विद्यार्थिनीनी रात्री आठ वाजता वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवण केलं. जेवणात छोलेची भाजी होती. ज्या विद्यार्थ्यांनींनी छोलेची भाजी खाल्ली त्यांना पहाटेपासूनच त्रास सुरू झाला, अशी माहिती रुग्णालयात दाखल विद्यार्थिनींनी दिली. सुरुवातीला केवळ आपल्यालाच उलट्या आणि जुलाब होत असतील म्हणून मुलींनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र सकाळी जवळपास दहा ते बारा मुलींना असाच त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती वसतीगृह प्रशासनाला दिली. त्यानंतर या सर्व मुलींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबद्दल चौकशी करून अन्नातून विषबाधा झाल्याचे आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात येईल अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय शंकर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी रुग्णालय आणि वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थिनींची विचारपूस केली.