(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मी दारुडा आमदार' टीकेला शहाजीबापूंचंं उत्तर, पहिल्यांदाच 'मातोश्री' लक्ष्य, राष्ट्रवादीला म्हणाले, पवारांबद्दल बोलायला लावू नका!
माझ्यावर टीका करायला आणि बदनाम करायला मातोश्री, सेना भवन आणि मुंबई येथून आदेश निघत असले, तरी मी या कोणालाच भीक घालत नाही, असं शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले.
पंढरपूर : मी दारुडा संत्रा आमदार या युवासेनेने (Yuva Sena Sangola) केलेल्या जहरी टीकेला शिंदे समर्थक सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपण असल्या टीकेला भीक घालत नसून या विरोधकांना थेट मैदानात उत्तरे देणार असा इशारा शहाजीबापू पाटील यांनी दिला आहे. कसले 50 खोके, साधी पेटीही पाहायला मिळत नाही. आता विरोधकांना थेट मैदानात उत्तरे देऊ, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
युवासेनेने काल गुरुवारी "संत्रा आमदार मुर्दाबाद, शहाजीबापू मुर्दाबाद" अशा घोषणा देत माळशिरस तालुक्यातील संगम इथे रास्ता रोको आंदोलन केलं. शहाजीबापूंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना सांगोल्यात भाड्याचे बंगले देतो असं विधान केल्याचा आरोप आहे. त्याविरोधात युवासेनेकडून शहाजीबापूंवर जहरी टीका केली होती.
शहाजीबापूंचं उत्तर
माझ्यावर टीका करायला आणि बदनाम करायला मातोश्री, सेना भवन आणि मुंबई येथून आदेश निघत असले, तरी मी या कोणालाच भीक घालत नाही. हातातील सत्ता गेल्याने शिवसेना आक्रमक होणे अपेक्षित होते. यातच आमदार बाहेर पडल्यावर राज्यात दंगली करायच्या, आमदारांच्या घरावर दगडे फेकायचा त्यांचा डाव होता. मात्र राज्यात असे काहीच न झाल्याने शिवसेना बिथरली आहे , असा हल्लाबोल शहाजीबापूंनी केला.
सांगोला हा अतिशय परिपक्व लोकांचा मतदारसंघ आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केले तरी इथे शिवसेनेला हजारापेक्षा जास्त मते मिळणार नाहीत, अशी खिल्ली शहाजीबापू पाटील यांनी उडवली.
शहाजीबापूंनी 50 खोके एकदम ओके ही शिंदे गटातील आमदारांवर होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. "ज्यांच्या डोक्यात कायम खोके मिळवायचे उद्योग असतात त्यांनाच खोके दिसतात. आम्हाला 50 खोके सोडा पेटीही बघायला मिळाली नाही", अशी मिश्किल टोलेबाजी शहाजीबापूंनी केली.
राष्ट्रवादीवर हल्लाबोल
यावेळी शहाजाबापूंनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. "राष्ट्रवादी हा सत्तेशिवाय न राहू शकणार पक्ष आहे. सत्तेसाठी तो कोणत्याही तत्वाला पायदळी तुडवितो. सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याने राष्ट्रवादीदेखील चिडलेली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून शहाजीबापूला टार्गेट केले जाते आहे" असं शहाजीबापू म्हणाले.
जॉनी लिव्हर म्हटल्याचा अभिमान
शिंदे गटाचे आमदार हसत हसत गुवाहाटीला गेले. हसत हसत सत्ता आणली आणि हसत हसत शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला जॉनी लिव्हर म्हटल्याचा आपल्याा अभिमान आहे, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना लगावला.
आपण पवारसाहेब किंवा अजितदादा यांचेवर काहीच बोललो नाही, ती बोलायची वेळ आणू नका, असा इशाराही शहाजीबापूंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.
राष्ट्रवादीच्या स्थापनेच्यावेळची कॅसेट काढून पाहा. त्यात माझे 35 मिनिटांचे भाषण होते. तर छगन भुजबळ यांचे फक्त 10 मिनिटांचे भाषण होते. स्थापनेवेळी हा मिटकरी चड्डीत असेल असा टोला लगावला .
आम्ही 35 वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत घासल्यावर इकडे आलोय. या मिटकरींना राष्ट्रवादी कळायला अजून बराच वेळ लागेल, अशी मिश्किल शेरेबाजी पाटील यांनी केली. आता विरोधकांना थेट जाहीर सभांतून जशास तसे उत्तर देणार असून पहिली सभा पैठण येथे मुख्यमंत्र्यांच्यासोबत होणार असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले .
शहाजीबापू निशाण्यावर
शिंदे फडणवीस सरकारवर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याचे काम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आपल्या खास शैलीत करत आहेत. अशातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून त्यांना लक्ष केले जाऊ लागले आहे. शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यात शिवसेनेकडून मेळावे घेतले जाऊ लागले असून सेनेच्या नेत्यांचे दौरेही वाढू लागले आहेत.
संबंधित बातम्या