माझ्या मर्दानगीचे खडसेंना का वेड लागलं? शहाजीबापू पाटील यांनी घेतला समाचार
shahajibapu patil on eknath khadse : मी कोणत्याही सरकारी इस्टेटीला ढापा मारून संसार चालवला नाही, असे म्हणत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
shahajibapu patil on eknath khadse : मी कोणत्याही सरकारी इस्टेटीला ढापा मारून संसार चालवला नाही, असे म्हणत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या मर्दानगीचे खडसेंना एवढे वेड का लागलंय, असा टोलाही त्यांनी लगावला.
खडसें साहेबांना इतकं का माझ्या मर्दानगीचं वेड लागलं आहे. माझी मर्दानगी तपासू नका , राजकारणात माझे हात पवित्र आहेत. मी कोणत्याही सरकारी इस्टेटी ढापून माझा संसार चालवला नाही असे सणसणीत उत्तर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले आहे. काही दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांनी जो बायकोला साडी घेऊ शकत नाही तो कसला मर्द अशा शब्दात शहाजीबापू यांची टर उडवली होती. या वक्तव्याने दुखावलेल्या शहाजीबापू यांनी आज एकनाथ खडसे यांना उत्तर दिले. चार वेळा पराभूत झाल्यावर माझी आर्थिक स्थिती खराबच होती. यावेळी भाऊ , मेव्हणे आणि सासुरवाडीच्या लोकांनी माझ्या संसाराला हातभार लावला हे सत्य आहे. माझ्या मित्राशी बोलताना हेच दुःख मी खाजगीत बोलून दाखवत होतो आणि दुर्दैवाने ती क्लिप व्हायरल झाली. मात्र माझ्या परिस्थितीवर टिप्पणी करण्याचा खडसेला काय अधिकार असा जळजळीत सवाल शहाजीबापू पाटील यांनी केला.
उद्धव ठाकरे सांगोल्यात येत असतील तर ते फार गांभीर्याने घेण्यासारखे नक्की नाही, असा टोला लगावत ते येतील सभा घेतील त्यांना बघायला लोकही जातील पण याचा काही फरक पडत नसतो असा टोला शहाजीबापूंनी लगावला. लक्ष्मण हाके , शरद कोळी असली लोके घेऊन शिवसेना पुढे चालवायला हे निघालेत , यांची जरा पार्श्वभूमी उद्धव साहेबानी तपासली तर त्यांना लगेच हाकलून देतील असा टोलाही शहाजीबापू यांनी लगावला. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगोला येथे दौरा होणार असून हा दौरा अभूतपूर्व असेल असा टोलाही शहाजीबापुनी लगावला.
रवी राणा यांचे खोक्या बाबतचे वक्तव्य अंत्यंत चुकीचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात लक्ष घालत असल्याचे त्यांनी सांगितले . एकदम 40 आमदार फुटल्यावर शिल्लक सेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी असले आरोप करण्यास सांगितले होते. पण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि सुज्ञ असल्याने असल्या आरोपांचा काहीही फायदा होणार नसल्याचे शहाजीबापू यांनी सांगितले. सुषमाताई अंधारे या आंबेडकरी चळवळीतून हिंदुत्ववादी चळवळीत कशा आल्या याचे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचा टोलाही यावेळी शहाजीबापू यांनी लगावला.