एका रिंगवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात, निवडणूक येऊद्या तुम्हाला हिसका दाखवतो, राम सातपुतेंचं मोहिते पाटलांना ओपन चॅलेंज
Ram Satpute : माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय.

Ram Satpute : माळशिरसचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय. माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी मोहिते पाटलांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एका रिंगवर माझा फोन उचलतात. आता कोणत्याही निवडणुका लागू द्या, तुम्हाला हिसका दाखवतो", असं ओपन चॅलेंज राम सातपुते (Ram Satpute) यांनी मोहिते पाटलांना दिलंय. ते माळशिरसमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
फडणवीस साहेब एका रिंगवर माझा फोन उचलतात - राम सातपुते
राम सातपुते म्हणाले, मी कार्यकर्ता आहे. भाऊ तुमची ताकद आहे. एका रिंगवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात. इतकं भाग्य मला भेटलं. कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आता कोणतीही निवडणूक लागू द्या. मैदानात या. तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढचं या ठिकाणी सांगतोय.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राम सातपुतेंचा पराभव
दरम्यान, राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील राम सातपुतेंनी मोहिते पाटलांना चॅलेंज केल्याचं पाहायला मिळालं होतं. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निडवणुकीत राम सातपुते यांना पराभव देखील स्वीकारावा लागला होता. राम सातपुते यांनी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांनी राम सातपुतेंचा पराभव केला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मोहिते पाटलांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी राम सातपुते केवळ 2 हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. मात्र, 2024 साली झालेल्या निवडणुकीत मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे कट्टर विरोधक एकत्र आलेले पाहायला मिळाले. मात्र, मोहिते पाटील आणि जानकर एकत्र येऊन देखील त्यांना केवळ 10 हजार मतांनी विजय मिळाला होता. दरम्यान, आता राम सातपुते सातत्याने मोहिते पाटलांना आव्हान देताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीसाठी मोहिते पाटलांनी सातपुतेंनी आव्हान दिलंय. त्यामुळे आता मोहिते पाटील राम सातपुतेंना काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























