Kolhapur Loksabha : कोल्हापुरातील दोन्ही जागांवर शरद पवार गटाचाही दावा; जयंत पाटलांचा मुलगा हातकणंगलेतून लोकसभेच्या रिंगणात? आढावा बैठकीत शरद पवारांसमोर पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारीची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.
मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर (Kolhapur Loksabha) शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून (Congress) दावा करण्यात आला असतानाच आता शरद पवार गटाकडूनही (Sharad Pawar) दावा करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकसभानिहाय आढावा बैठकीत शरद पवारांकडे एकमुखाने मागणी पदाधिकऱ्यांकडून करण्यात आली.
दोन्ही मतदारसंघावर शरद पवार गटाकडून दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यावेळी बैठकीत कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आली असून मविआच्या जागावाटपातही हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी घेतली.
यावेळी, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे, आमदार बाळासाहेब पाटील, अशोक पवार, माजी आमदार कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर आदी उपस्थित होते.
सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादीची तिसरी पिढी सक्रीय
दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र व राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील यांनी अलीकडेच सरकारच्या कंत्राटी भरतीवर जोरदार टीका केली होती. त्याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिसरी पिढीही सरकार विरोधात सक्रीय होताना दिसत आहे. कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठीच्या 'वेगवान' हालचाली सुरू केलेल्या आहेत. यांच्या वेगाला कात्री लावण्याची जबाबदारी आपली आहे असे आवाहन त्यांनी तरुणांना ट्विटमधून केले होते. 11 हजार जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नोव्हेंबरपर्यंत 1 लाख जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार असल्याची माहिती आहे. यावरून त्यांनी टीकास्त्र सोडले.
सुशिक्षित बेरोजगारांचे नाही भान, कंत्राटी कामगारांसाठी मात्र निर्णय वेगवान
त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, महाराष्ट्राच्या #TroubleEngine सरकारने दहा दिवसांत ११ हजार जागा #कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर पर्यंत तब्बल १ लाख जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठीच्या 'वेगवान' हालचाली सुरू केलेल्या आहेत. युवकांनो, येणाऱ्या #विधानसभा निवडणुकीत यांच्या वेगाला कात्री लावण्याची जबाबदारी आपली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या