निकालाआधीच उत्तमराव जानकरांच्या विजयाचे लागले बॅनर, राज्यात सर्वाधिक मतांनी जानकर निवडून येणार, कार्यकर्त्यांना विश्वास
ळशिरस विधानसभा मतदारसंघातील (Malshiras Assembly Constituency) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांच्याही विजयाचे बॅनर माळशिरस तालुक्यात लागायला सुरुवात झाली आहे.
Malshiras Assembly Constituency : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Constituency) बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या (23 नोव्हेंबर) लागणार आहेत. दरम्यान, विधानसभेचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच अनेक मतदारसंघ उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकताना दिसत आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील (Malshiras Assembly Constituency) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांच्याही विजयाचे बॅनर माळशिरस तालुक्यात लागायला सुरुवात झाली आहे.
उत्तमराव जानकर हे राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजय होतील , कार्यकर्त्यांचा दावा
विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या पार पडणार आहे. मात्र, आज विजयाचे बॅनर लागायला सुरुवात झाली आहे. उत्तमराव जानकर हे राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजय होतील असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. माळशिरस या राखीव मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या विरोधात उत्तम जानकर अशी लढत होत आहे. या मतदारसंघात मोहिते पाटील कुटुंबाची मोठी ताकद आहे. यावेली मोहिते पाटील आणि जानकर हे दोघे एकत्र आल्याने निकालाची फक्त अनौपचारिकता बाकी असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
2019 च्या निवडणुकीत काय झालं होतं?
सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा आणि माजी पालकमंत्र्यांचा मतदारसंघ राहिलेल्या माळशिरस मतदारसंघात यंदा भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत होत आहे. गत 2019 च्या निवडणुकीत येथून भाजपचे राम सातपुते विजयी झाले होते, त्यांना राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांनी टफ फाईट दिली होती. यंदाही येथील मतदारसंघात अशीच लढत आहे. मात्र, यंदा राजकीय स्थित्यंतर व गणितं बदलली आहे. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जानकर विरुद्ध राम सातपुते अशीच लढत झाली आहे. त्यामुळं चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
लोकसभेला माळशिरस विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटलांना लीड
लोकसभा निवडणुकांमध्ये यंदा मोहिते पाटलांनी भाजपला धक्का देत ऐनवेळी तुतारी हाती घेतली होती. त्यामुळे, धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली. त्यामुळे, माळशिरस हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असल्याने येथील मतदारसंघातून त्यांना मताधिक्य मिळणार हे निश्चित मानलं जात होतं. त्यातच, भाजप महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा जनसंपर्क येथील मतदारसंघात कमी असल्याने, व भाजप आमदार राम सातपुते यांच्यापेक्षा मोहित पाटलांचं वर्चस्व मतदारसंघात असल्याने धैर्यशील मोहिते पाटलांनी येथून आघाडी घेतली. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून तब्बल 70,134 मतांचा लीड धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळाला होता. त्यामुळे, यावेळी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं पारडं जड मानलं जात आहे.